संजय मोने, अभिनेते
खाण्याच्या वेळा या आमच्या व्यवसायात कायम बदलत्या असतात. प्रयोग रात्रीचा असेल तर मग तो दिवस उलटून गेल्यानंतरच जेवणाचे ताट समोर येते. पूर्वी गोव्यात साडेदहाच्या नंतर प्रयोग सुरू व्हायचा. शिवाय त्या काळात नाटके तीन तासांची असायची. प्रयोग इतक्या उशिरा का? असे विचारल्यावर बाजार बंद झाला की, लोक घरी जाऊन जेवून नाटकाला येतात म्हणून असे उत्तर मिळाले.
डॉ. श्रीराम लागू यांनी त्या काळात संध्याकाळी सात वाजता प्रयोग सुरू केले. त्यांच्या नाटकांना गर्दीही व्हायची. असो. तर आमची नाटके एक-दीडच्या सुमारास संपायची. त्यानंतर नेपथ्य आमच्या नाटकाच्या बसच्या डोक्यावर चढवले की, मग जेवणाच्या ठिकाणी जायला लागायचे. तिथे गेल्यानंतर मग खानावळवाल्याच्या डोळ्यात अनावर झोप आणि आमच्याबद्दल तिरस्काराची भावना असायची. त्याबद्दल त्याला दोष देण्यात अर्थ नसायचा. वीस-पंचवीस माणसांना रात्री अडीच वाजता जेवण देऊन त्याला काय पैसे मिळत असणार? आणि कशासाठी हा खटाटोप तो मालक करत असेल? त्याचे उत्तर एकच. त्याला नाटकाबद्दल वाटणारी ओढ. साधे जेवण असायचे. एखादी भाजी, आमटी, पोळी, भात, कोशिंबीर, दही किंवा ताक. जेवण पोटभर असायचे; पण पोटाची भरून घ्यायची इच्छा मेलेली असायची. कोकण-गोव्यात सोलकडी असायचीच, पण नारळाच्या दुधाची नाही तर पारदर्शक. त्याला तिवळ किंवा फुटीकढी म्हणतात.
निर्माता जरा बरा असेल तर मासेबिसे असायचे. मराठवाड्यात आमटी वेगळी असायची. कोल्हापुरात वेगळी. प्रांतागणिक चव निराळी, पण आमटीच्या डाळीचे प्रमाण तेच असायचे. एका वाटीभर पाण्याला अर्धा चमचा डाळ; पण भूक अनावर झाल्याने चार घास पोटात ढकलायचे. जेवणाच्या ठिकाणी सगळ्यांना एकच अन्न मिळायचे. त्यात पंक्तिभेद किंवा ताटभेद नसायचा.
सध्या कुठल्या भाजीचा सीझन चालू आहे हे कळायचे असेल, तर नाटकात काम करावे. सीझनमध्ये येणारी भाजी हटकून पानात असायची. एकाच प्रांतात दौरा असेल तर मात्र दररोज तेच खायला मिळायचे. वांगी तर वांगी. पडवळ तर पडवळ. इतर सगळे दोष लपविण्यासाठी भाजीत मसाला मात्र जोरदार असायचा. अगदी मुक्कामाला जाऊन अंथरुणावर पडल्यानंतरही जाणवेल असा. इतकेच काय सकाळी उठल्यावरही पेटती फुलबाजी गिळल्यासारखे छाती-पोटात जळजळत असायचे. इतका त्रास वर्षांनुवर्षे होऊनही नाटक करावेसे वाटते. कारण आवड आणि महत्त्वाचे म्हणजे जेवणाबद्दल असलेल्या काही सुखद आठवणी. अत्यंत रुचकर आणि उत्कृष्ट पदार्थही चाखायला मिळाले ते नाटकांच्या दौऱ्यामुळे. नाहीतर कशाला मी मुंबईतून उठून औरंगाबाद किंवा जळगावला जेवायला जाईन? त्याबद्दल आता इथून पुढे...