शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे झंझावात. लाखो शिवसैनिकांचं दैवत. सत्तेच्या सिंहासनावर कधीही न बसलेल्या, पण मराठी माणसाच्या मनावर आणि महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या बाळासाहेबांबद्दल देशभरातील तरुणाईला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. स्वाभाविकच, बाळासाहेबांचा बायोपिक असलेल्या 'ठाकरे' या सिनेमाबद्दल उत्सुकता आहे. ही उत्सुकता ट्रेलरमुळे आणखी वाढली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या ट्रेलरबाबत संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
ठाकरे या सिनेमाचा ट्रेलर हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत असून हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात अडकला आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवर आणि संवादावर सेन्सॉरने बोर्डाने आक्षेप नोंदवला होता आणि आता काही दाक्षिणात्य कलाकारांनी या चित्रपटाच्या काही संवादांवर आक्षेप घेतला आहे. रंग दे बसंती या चित्रपटामुळे सिद्धार्थ हे नाव बॉलिवूड इंडस्ट्रीला देखील चांगलेच माहीत आहे. त्याने ट्वीट करत चित्रपटातील संवादावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये उठाओ लुंगी, बजाओ पुंगी हा संवाद आपल्याला ऐकायला मिळत आहे. याच संवादावर सिद्धार्थने आक्षेप घेतला आहे. हा संवाद दाक्षिणात्य लोकांबाबत द्वेष दर्शवणारा असल्याचे त्याचे मत आहे. सिद्धार्थने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ठाकरे सिनेमात नवाझुद्दीनने त्याच्या संवादात अनेकवेळा उठाओ लुंगी, बजाओ पुंगी असे म्हटले आहे. या संवादातून दाक्षिणात्य समाजाविषयी असलेला द्वेष दिसून येत आहे. अशा प्रकारे तुम्ही पैसे कमवणार आहात का? द्वेष विकणे बंद करा... अतिशय भीतीदायक आहे हे सारे...
ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला बाबरी मशिद प्रकरणानंतर उसळलेली दंगल पाहायला मिळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या डोक्यात स्वतंत्र संघटनेचा आलेला विचार आणि त्यानंतरचा शिवसेनेचा झंझावाती प्रवास, बाळासाहेबांचं ज्वलंत हिंदुत्व, मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी, मुंबईत दंगल उसळली असताना त्यांनी दिलेला 'आवाज', कामगारांना दिलेला आधार, बाबरी प्रकरणात त्यांनी दिलेली साक्ष, त्यांना सावलीसारखी साथ देणाऱ्या मांसाहेब, जावेद मियांदादला लगावलेला 'षटकार' हे सगळे प्रसंग या ट्रेलरमध्ये पाहायला मिळताहेत.