Join us

सांस्कृतिक वादावर भाष्य करणारी कथा

By admin | Published: August 20, 2016 2:31 AM

जिमी शेरगीलला त्याच त्या बॉयफ्रेंडच्या भूमिकांमध्ये पाहून आता कंटाळा आलाय. तीच शेरवानी, तोच गुंडा, तोच हट्ट. खूप झालं आता. त्यात एका मुलावर प्रेम असताना दुसऱ्या मुलासोबत

- जान्हवी सामंतहिंदी चित्रपट - हॅपी भाग जाएगीजिमी शेरगीलला त्याच त्या बॉयफ्रेंडच्या भूमिकांमध्ये पाहून आता कंटाळा आलाय. तीच शेरवानी, तोच गुंडा, तोच हट्ट. खूप झालं आता. त्यात एका मुलावर प्रेम असताना दुसऱ्या मुलासोबत लग्न होणाऱ्या मुलींच्या चित्रपटांविषयी थोडासा कंटाळा आलाय.आपल्या आई-बाबांना लग्नाला नकार देण्याचे धाडस नसताना, अगदी वरात समोर उभी असताना, घरातून पळून जाण्याचा आणि मग अगदी पाकिस्तानमध्ये पोलिसांना आणि गुंडांना वठणीवर आणायचं धाडस करणाऱ्या मुलींचं नवलच वाटतं. पण हॅपी करोडोंमध्ये एक मुलगी आहे. हॅपी भाग जाएगी चित्रपटात ती काही फारसं महान काम करत नाही. पण तिचा बॉयफ्रेंड गुड्डूला (अली फजल) असं वाटतं आणि कथानकामधल्या बाकी कलाकारांनाही असंच वाटतं. म्हणून आपणही हे मानून चाललो तर चित्रपट अगदी टाइमपास आहे.हॅपीच्या वडिलांनी तिचे लग्न स्थानिक नगरसेवक बग्गा (जिमी शेरगील) याच्याशी ठरवलेलं असतं. पण हॅपीला ते पसंत नसतं आणि म्हणून ती बॉयफ्रेंड गुड्डूची मदत घेऊन पळून जाण्याचा प्लॅन बनविते. पण प्लॅन फिसकटतो आणि हॅपी पोहोचते राजकारणी जावेद अहमदच्या घरी लाहोरमध्ये. त्यांचा मुलगा बिलाल वडिलांचा डोळा चुकवून आणि पोलीस अधिकारी आफ्रिदीची (पीयूष मिश्रा) मदत घेऊन हॅपीला भारतात परत पाठविण्याचे कारस्थान करतो. यामुळे खूपच अशक्य पण हास्यास्पद प्रसंग घडतात.गोष्टीचा सत्य परिस्थितीशी किंवा लॉजिकशी काहीही संबंध नसूनही आपण त्या विनोदी गोष्टीमध्ये रंगून जातो. म्हणजे शाहण्यासारखे हॅपीला परत भारताला पाठविण्याऐवजी तिच्या बॉयफ्रेंडला पाकिस्तानात बोलावून घ्यायचे किंवा कामधंदा नसलेल्या मुलासाठी हॅपी एवढे धाडस करू शकते हेच इतके विसंगत आहे की बाकी कथानकाकडून काहीही अपेक्षा करणे चुकीचेच ठरेल. गोष्ट तशी वेगळीच आहे. पळून जाणाऱ्या मुली आणि पाकिस्तानबरोबर असलेल्या सांस्कृतिक वादासंदर्भातील विनोदी कथा आपण पाहिल्या आहेत. पण मुदस्सर अझीझची कथा सांगण्याची पद्धती खूप मनोरंजक आहे. खूप खोलात न जाता, अझीझने हलकीफुलकी विनोदी गोष्ट सादर केली आहे. त्याच्या कलाकारांनीही त्याला चांगली साथ दिली आहे. प्रमुख कलाकार असूनसुद्धा डायनाला फारशी लांबलचक भूमिका नाही, तरीही ती नेटाने निभावते. थोडा गंभीर स्वरूपाचा असला तरी मोमल शेखने आपली भूमिका चांगली निभावली आहे. अली फजल गुड्डूच्या भूमिकेत गरीब बिचारा वाटतो. चित्रपटामध्ये सर्वांत शक्तीशाली विनोद मात्र जिमी शेरगील, अभय आणि पीयूष मिश्राने केला आहे. मिश्राच्या उर्दू संवादामुळे झालेले गैरसमज हे तर अगदी हिट आहेत. विनोदांमधून पाकिस्तान-भारतामधल्या सांस्कृतिक वादावर खूप मोठा संदेश हा चित्रपट देतो. क्रिकेट, चित्रपट, पाहुणचार, भाषा आणि मुख्य म्हणजे आपल्या संस्कृतीमुळे हे देश अजूनही जोडलेले आहेत. थोडक्यात काय, हॅपी भाग जाएगी जरूर पाहा.