- अनुज अलंकार, मुंबई‘फंस गये रे ओबामा’ आणि ‘जॉली एलएलबी’चे दिग्दर्शक सुभाष कपूर यांचा नवा चित्रपट ‘गुड्डू रंगीला’ ३ जुलैपासून प्रदर्शित झाला आहे. अर्शद वारसी, अदिती राव हैदरी आणि अमित सद हे या चित्रपटाचे प्रमुख कलावंत. या तिघांनी ‘लोकमत’ कार्यालयाला दिलेल्या भेटीत ‘गुड्डू रंगीला’शी संबंधित अनेक मुद्द्यांवर मनमोकळी चर्चा केली.अशी भूमिका मी प्रथमच साकारली - अर्शद वारसीया चित्रपटाबाबत अर्शद वारसी खूप उत्साहित आहे. ‘जॉली एलएलबी’मध्ये काम करण्यासाठी कपूर यांनी विचारणा केली तेव्हापासून माझे-त्यांचे सूर जुळले. दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्यात चांगला समन्वय व समजून घेण्याचा गुण असणे हे दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल अर्शद म्हणाला, ‘‘त्यातील रंगीलाची भूमिका मी साकारली आहे व गुड्डू (अमित सद) त्याचा भाऊ आहे. आम्ही दोघे बंधू लहान-मोठे गुन्हे करून पोट भरत असलो तरी आम्ही मनाने फार चांगले आहोत व वाईट कामेही मन लावून करतो. आमच्या आयुष्यात अशी एक मोठी संधी येते की एका मुलीचे अपहरण करून त्यातून खूप मोठा पैसा कमावता येईल. आम्ही या अपहरणास तयार होतो. मात्र हा निर्णय आमच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकतो.’’ गुड्डू खेळकर आहे - अमित सददूरचित्रवाणीवरील मालिकांतून चित्रपटात पदार्पण करणाऱ्या अमित सद याचा हा दुसरा चित्रपट. त्याचा पहिला चित्रपट हा ‘काय पोचे’ होता व त्यातील भूमिकेचे खूप कौतुकही झाले होते. त्याची ‘गुड्डू रंगीला’मध्ये गुड्डूची भूमिका आहे. त्याबद्दल तो म्हणाला ‘‘गुड्डू हा सामान्य मुलगा असून तो मजेत आयुष्य जगत असतो व जीवनाकडे फार गांभीर्याने बघत नसतो. आपला भाऊ रंगीलाबरोबर तो आनंदी असतो. एका मुलीच्या अपहरणाचे काम त्यांच्याकडे येते तेव्हा ते त्या कामाच्या मोहात पडतात व त्यांचे आयुष्य वेगळेच वळण घेते.’’ माझी भूमिका खूपच वेगळी - अदिती राव हैदरीराकेश मेहरांचा चित्रपट ‘दिल्ली ६’ पासून ते इम्तियाज अली यांच्या ‘रॉक स्टार’मध्ये आपल्या छोट्याशा भूमिकेने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अदिती राव हैदरी ही ‘गुड्डू रंगीला’मध्ये नायिका आहे. अदितीने सांगितले की, चित्रपटात माझ्या भूमिकेचे नाव बेबी असून गुड्डू व रंगीला माझे अपहरण करतात. शांत व अबोल असणारी ही मुलगी आपल्या नियंत्रणात राहील असा त्या दोघांचा समज असतो, परंतु बेबी जेव्हा आपले खरे रूप दाखविते त्या वेळी त्या दोघांची झोपच उडते. बेबीची भूमिका प्रेक्षकांना धक्का देणारी आहे. अशा प्रकारचीभूमिका साकारण्याची संधी मला पहिल्यांदाच मिळाली आहे. प्रेक्षकांना बेबीची भूमिका आवडेल व लक्षातही राहील. कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीतचित्रपटातील एक गीत ‘माता ने बुलाया हैं...’वरून वाद निर्माण झाला आहे. त्याबद्दल फार खोलात शिरण्यास नकार देताना अर्शदने स्पष्ट केले की, आम्हाला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आम्ही चित्रपट तयार केला आहे. आम्ही कोणाच्या भावनांचा अनादर का करू? आम्ही मनोरंजनासाठी ते गाणे त्यात ठेवले आहे. वाद निर्माण झाल्यानंतरही अनेक प्रेक्षकांना ते गीत आवडल्याबद्दल मी खूप समाधानी आहे, असेही अर्शद म्हणाला.