Join us  

धाडसी नीरजाची सशक्त कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 2:17 AM

दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या विमानातील ३०० प्रवाशांचे जीवित स्वत:चा जीव गमावून वाचविणाऱ्या हवाईसुंदरी नीरजा भानोतला ‘नीरजा’ या चित्रपटाने तिचे धाडस व समयसूचकतेबद्दल जणू श्रद्धांजलीच वाहिली आहे.

दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या विमानातील ३०० प्रवाशांचे जीवित स्वत:चा जीव गमावून वाचविणाऱ्या हवाईसुंदरी नीरजा भानोतला ‘नीरजा’ या चित्रपटाने तिचे धाडस व समयसूचकतेबद्दल जणू श्रद्धांजलीच वाहिली आहे. दिग्दर्शक राम माधवानी यांच्या या चित्रपटात भावनांचा समुद्र प्रेक्षकांना स्वत:सोबत राखण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरला आहे.नीरजा (सोनम कपूर) आई रमा (शबाना आझमी) व वडील हरीश (योगेंद्र टिकू) यांच्यासोबत आनंदी जीवन जगत असते. मॉडेलिंगनंतर नीरजा हवाईसुंदरी व्हायचा निर्णय घेते. तिच्या आईवडिलांचाही या निर्णयाला पाठिंबा मिळतो. नीरजाचे आयुष्य मजेत व सुखात सुरू असते. तिचा मित्र असतो जयदीप (शेखर). नीरजाला तिच्या २४व्या वाढदिवसाच्या आधी दोन दिवस न्यू यॉर्कला जाणाऱ्या पॅनअ‍ॅमच्या विमानात कामावर जावे लागणार असते. कराचीमध्ये या विमानाचे दहशतवादी अपहरण करतात व तेथून भयंकर संघर्ष सुरू होतो. विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नीरजा स्वत:चा जीव पणाला लावायला मागेपुढे बघत नाही.चित्रपटाची वैशिष्ट्ये : ‘नीरजा’ हा पूर्णपणे सोनम कपूरचा आहे यात काहीही शंका नाही. तिने नीरजाच्या भूमिकेचे प्रत्येक टप्प्यावरील आव्हान स्वीकारले आहे. सोनम कपूरच्या उत्तम अभिनयासाठी त्याची आठवण राहील. एक आनंदी, सुखी तरुणी ते दहशतवाद्यांशी लढणारी धाडसी तरुणी या भूमिका तिने प्रत्येक टप्प्यावर जिवंत केल्या आहेत. चित्रपट बघितल्यावर नीरजाने कोणत्या परिस्थितीला तोंड दिले असेल याची कल्पना येते. नीरजाची भूमिका बांधेसूद करण्यात उत्तम पटकथा आणि संवादांची मोठी भूमिका आहे. नीरजाच्या आईची भूमिका साकारून शबाना आझमी यांनी आपण हिंदी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार अभिनेत्री का आहोत हेच दाखविले आहे. नीरजाचा मित्र बनून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलेल्या संगीतकार शेखर (विशाल-शेखर जोडीतील) याला बरेच कष्ट करावे लागतील. दिग्दर्शक राम माधवानी यांचे मोठे यश म्हणजे त्यांनी चित्रपटाला भरकटू दिले नाही. यामुळे प्रेक्षकांचे चित्रपटाशी भावनिक नाते निर्माण होते. चित्रपटाच्या कळसाध्यायात तर भावनांचा जणू समुद्रच सामोरा येतो. तांत्रिक अंगांनी चित्रपट सशक्त आहे, विशेषत: त्याचे संपादन उत्तम व कॅमेरावर्क छान आहे.