मराठी चित्रपट असो वा हिंदी... स्त्रीप्रधान चित्रपटांची संख्या तशी नगण्यच आहे. तिच्या समस्या, तिचं म्हणणं हातोटीने मांडणारे चित्रपट तयार होण्याची आज गरज आहे. कारण आज समाज सुधारत आहे, असं आपण म्हणत असलो तरी स्त्रियांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. दर सेकंदाला देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात महिला अन्यायाला बळी पडत आहेत. पण हीच अबला जेव्हा सबला होऊन दुर्गामातेचं रूप धारण करते तेव्हा काय काय घडू शकतं, हेही आपण अनेक सत्य घटनांवरून अनुभवलं आहे. नेमका हाच विषय मांडला आहे दिग्दर्शक गोरख जोगदंडे यांनी ‘नजर’ या चित्रपटातून. एका गावात राहणाऱ्या आंधळ्या पण देखण्या मुलीच्या प्रेमात एक तरुण पडतो. पण कामानिमित्त त्याला मुंबईला जावं लागतं; मात्र त्यानंतर तो गावाकडे परततो का? त्याचं नेमकं काय होतं? की तो तिला फसवतो? की तो कोणत्या अडचणीत फसतो? ते या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात स्वप्निल राजशेखर, तेजा देवकर, रवी पटवर्धन, अरुण नलावडे, विजय गोखले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौगुले, दीपज्योती नाईक, दिलीप वाघ, डॉ. हरी कोकरे, फकिरा वाघ, श्यामसुंदर भालेराव आदी कलाकार आहेत. गोरख जोगदंडे यांनीच चित्रपटाची कथा लिहिली असून डॉ. हरी कोकरे यांच्यासोबत पटकथाही लिहिली आहे. अजय आर. गुप्ता, दिलीप वाघ, डॉ. हरी कोकरे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
जबरदस्त प्रेमकथा ‘नजर’
By admin | Published: October 31, 2015 12:35 AM