Join us  

एअरलिफ्टमध्ये अक्षयकुमारनं केलाय आत्तापर्यंतचा कसदार अभिनय - प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

By admin | Published: January 22, 2016 4:10 PM

क्या कूल है हम ३, वगळता फारशी स्पर्धा नसलेल्या या आठवड्यात अक्षयकुमारचा अभिनय असलेल्या एअरलिफ्टला चांगला प्रतिसाद मिळाला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - क्या कूल है हम ३ वगळता फारशी स्पर्धा नसलेल्या या आठवड्यात अक्षयकुमारचा अभिनय असलेल्या एअरलिफ्टला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. इराकने कुवेतवर केलेल्या आक्रमणामध्ये १ लाख ७० हजार भारतीयांची दैना होते. खिशात पैसे नाहीत नी रहायला घर नाही अशा अवस्थेत असलेल्या भारतीयांना कुवेतमध्ये धनाढ्य उद्योगपती असलेला रणजीत कट्याल (अक्षय कुमार) कशी मदत करतो हे या चित्रपटाचं सार आहे. सुखरूपपणे कुवेत सोडून विदेशात जाण्याचा पर्याय असतानाही रणजीत कट्याल, कुवेत सोडत नाही आणि लाखो भारतीयांना वाचवतो यावर हा पूर्ण चित्रपट बेतलेला आहे.
चित्रपट रसिकांनी फर्स्ट डे फर्स्ट शो बघून ट्विटरच्या माध्यमातून सिनेमा कसा वाटला हे जगाला कळवायला सुरुवात केली असून, काही निवडक अभिप्राय पुढीलप्रमाणे:
 
- अक्षय कुमार, निमरत कौर, फरयाना वझीर, इनाम उल हक, लीना, पूरब कोहली, कुमुद मिश्रा, प्रकाश बेलवडी अशा सगळ्यांचा अभिनय उत्कृष्ट असून, अक्षय कुमारचा तर आत्तापर्यंतचा सगळ्यात सुंदर अभिनय ठरू शकेल.
- अभिनयाबरोबरच, संगीत, सिनेमॅटोग्राफी आणि राजा मेननचे संवाद चित्रपटाचे प्लस पॉइंट आहेत.
- पटकथा एकदण घट्ट विणलेली आहे. हा चित्रपट म्हणजे सत्य आणि मनोरंजन दोघांचा सुंदर मिलाफ आहे.
- एका शब्दात सांगायचं, तर अफलातून. अक्षयकुमारने अत्यंत संयत, हुषार, वास्तवाचं भान असलेली आणि नियोजनबद्ध भूमिका साकारलीय. आत्तापर्यंतचा त्याचा सगळ्यात चांगला अभिनय.
- हा सिनेमा बघितल्यावर भारतीय असल्याचा अभिमान जागा होतो.
- संपूर्ण चित्रपट बघताना पोटात गोळा येतो, उत्कंठा ताणली जाते, परंतु चित्रपट संपतो त्यावेळी आनंदात, हसत हसत प्रेक्षक बाहेर जातात.