कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता, देशात लॉकडाऊन पुकारण्यात आले. बॉलिवूडबद्दल बोलाल तर लॉकडाऊनच्या काळात इंडस्ट्री ठप्प आहे. चित्रपट व मालिकांचे शूटींग, आगामी सिनेमांचे रिलीज सगळे काही ठप्प. पण अशात दिग्गज दिग्दर्शक सुभाष घई यांनी मात्र एक मोठी घोषणा करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. होय, सुभाष घई लॉकडाऊनच्या काळात दोन प्रोजेक्टवर काम करत आहेत. यापैकी एक प्रोजेक्ट कुठला तर खलनायक 2. होय, संजय दत्तचा सुपर डुपरहिट सिनेमा ‘खलनायक’च्या सीक्वलची तयारी सुरु झाली आहे. सुभाष सुभाष घई यांनी या सीक्वलच्या कथेबद्दलही हिंट दिली आहे.
मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सुभाष घई आपल्या दोन प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले, ‘लॉकडाऊनच्या काळातही मी 8-10 तास बिझी आहे. यापैकी किमान 3 तास मी माझ्या आगामी चित्रपटांवर काम करतोय. ‘खलनायक’ आणि ‘कालीचरण’ या दोन सिनेमांच्या सीक्वलवर माझे काम सुरु आहे. माझ्याकडे दोन स्क्रिप्ट आहेत. यापैकी एक स्क्रिप्ट ‘खलनायक’ची आहे. गेल्या सात महिन्यांपासून मी या स्क्रिप्टवर काम करतोय. बल्लू तुरुंगाबाहेर येतो, हे या सीक्वलमध्ये दाखवले जाणार आहे.’
तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘कालीचरण’ या चित्रपटाद्वारे सुभाष घई यांनी दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा नंतर तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेतही बनवला गेला होता. आता याचा सीक्वलही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अशी असेल ‘खलनायक 2’ची कथा
1993 मध्ये रिलीज ‘खलनायक’ या सिनेमत संजय दत्तने गँगस्टर बलराम प्रसाद उर्फ बल्लूची भूमिका साकारली होती. बल्लूला एका अंडरकव्हर पोलिस ऑफिसरशी प्रेम होते, असे याचे कथानक होते. या पोलिस ऑफिसरची भूमिका माधुरी दीक्षितने साकारली होती. आता या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये बल्लू तुरुंगातून बाहेर आल्यावर काय होते, हे दाखवले जाणार आहे. यात एक नवा यंग विलेन दिसणार आहे.