सध्या सगळीकडेच ‘सुभेदार’ या ऐतिहासिक मराठी चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटातून नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची असीम गाथा आणि सिंहगडाच्या लढाईचा थरार रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. अजय पूरकर गेल्या काही दिवसांपासून ‘सुभेदार’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. अशाच एका मुलाखतीत अजय पूरकर यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.
अजय पूरकर यांनी नुकतीच ‘रेडिओ मिरची’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना “मराठी माणसाने कोणती गोष्ट आपल्या अंगी बाळगली पाहिजे आणि कोणती गोष्ट सोडली पाहिजे?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अजय पूरकर यांनी त्यांचं मत मांडलं. “मराठी माणसाने महाराष्ट्र सोडला पाहिजे. व्यवयाय, करिअर यासाठी त्याने बाहेर पडलं पाहिजे. खूप कमी मराठी माणसं आहेत, जे इतर भाषा बोलतात. मी लहान असताना पुण्यातील सदाशिव पेठेत दोन सरदार बंधू होते. ते कारपेंटरचा व्यवसाय करायचे. पण ते उत्तम मराठी बोलायचे. फोनवर बोलताना ते मराठी नाही सरदार आहेत, हे ओळखू यायचं नाही,” असं ते म्हणाले.
पुढे त्यांनी “मराठी माणसाने काही गोष्टी सोडल्या पाहिजेत. उद्या जर तुम्हाला बंगळूरला जायचं असेल, तर कन्नड शिका. जेव्हा तुम्ही भाषा शिकता तेव्हा खूप फरक पडतो. आपण बाहेर पडून ती भाषा नाही शिकत. आज कुठलीही व्यक्ती कुठेही जाऊन काम करू शकते. त्याचा उपयोग करुन घेतला पाहिजे,” असंही सांगितलं. अजय पूरकर यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
तान्हाजी मालुसरेंआधी अजय पूरकर ‘पावनखिंड’ चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत दिसले होते. त्यांनी साकारलेली बाजीप्रभूंची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता ‘सुभेदार’ चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. अजय पूरकर यांच्याबरोबर या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, स्मिता शेवाळे, विराजस कुलकर्णी, समीर धर्माधिकारी अशी कलाकारांची तगडी फौज आहे.