Join us

‘गड आला पण सिंह गेला’ असा तयार झाला ‘सुभेदार’!

By कोमल खांबे | Published: August 23, 2023 12:50 PM

चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ‘लोकमत’शी साधला संवाद

कोमल खांबे

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या चित्रपटांच्या यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘श्रीशिवराज अष्टक’मधील पाचवं पुष्प ‘सुभेदार’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची असीम गाथा ‘सुभेदार’मधून रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ‘लोकमत’शी साधलेला खास संवाद.

याआधीही तान्हाजी मालुसरेंवर हिंदी सिनेमा येऊन गेला आहे. ‘सुभेदार’ करताना याचं दडपण होतं का?

दिग्पाल : ‘सुभेदार’ चित्रपट बनवताना दडपण नव्हतं. कारण, प्रत्येक दिग्दर्शकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. शिवराज अष्टकाच्या सुरुवातीलाच मी हा सिनेमा कसा करायचं ठरवलं होतं. त्यानुसार आवश्यक तो रिसर्च करुन गोष्टी चित्रपटात मांडल्या आहेत. 

ऐतिहासिक सिनेमांमध्ये लिबर्टी घेणं कितीपत योग्य वाटतं?

दिग्पाल : आपला इतिहास काही ठिकाणी ऐतिहासिक पुरावे आणि कागदपत्रांच्या अभावी अपुरा आहे. त्यामुळे काही गोष्टींचे संदर्भ लागत नाहीत. अशावेळी मग तेव्हाच्या काळात परिस्थिती काय असू शकते याचा विचार केला जातो. ऐतिहासिक सिनेमांमध्ये एवढीच लिबर्टी घ्यावी. कथानक रंजक करण्यासाठी स्वत:च्या कल्पनेतील काहीही दाखवू नये, असं मला वाटतं. सिंहगडाच्या लढाईत घोरपडीचा उल्लेख फक्त एका पोवाड्यात आहे. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये तसा उल्लेख आढळत नाही. अशावेळी आम्ही दोनपेक्षा जास्त संदर्भग्रंथात प्रसंगाचा उल्लेख असेल, तरच ते गृहित धरुन चित्रपटात त्याची मांडणी करतो.

महाराजांच्या कोणत्या गोष्टीचा राज्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे, असं वाटतं?

दिग्पाल : महाराजांची कृषीनिती आणि पर्यावरणनितीचा अभ्यास राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. त्यामुळे बळीराजासाठी चांगल्या योजना निर्माण करता येतील. 

चिन्मय : राज्यकर्त्यांनी महाराजांची दूरदृष्टी अंगीकारणं अत्यंत गरजेचं आहे. स्वराज्याप्रती महाराज आणि मावळ्यांमध्ये ज्या प्रकारची निष्ठा होती, ते खूप महत्त्वाचं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना काय काळजी घेतोस?

चिन्मय : महाराजांची भूमिका साकारताना दडपणापेक्षाही जबाबदारीची जाणीव असते. लोकांच्या मनातील महाराजांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, ही प्राथमिक जबाबदारी असते. त्यामुळे अभिनय करताना त्याचं भान नेहमी ठेवावं लागतं. नाहीतर मग लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. 

ऐतिहासिक चित्रपट बनवताना काय काळजी घ्यावी? 

चिन्मय : दिग्पालने आत्तापर्यंत महारांजावर चार सिनेमे केले आहेत. ‘सुभेदार’ हा पाचवा सिनेमा आहे. पण, यातील एकाही सिनेमावरून वाद निर्माण झालेला नाही. कारण, संपूर्ण अभ्यास करुनच हे चित्रपट बनवले गेले आहेत. चित्रपट बनवताना महाराज आणि मावळ्यांप्रती आदर बाळगणं महत्त्वाचं आहे. कारण, शिवरायांच्या बाबतीत काही चुकीचं दाखवलं, तर लोकं माफ करणार नाहीत. 

चित्रपट का पाहावा?

सिंहगडाची लढाई ही महत्त्वाची मानली जाते. या लढाईत सुभेदार तान्हाजी मालुसरेंनी प्राणांची आहुती देत कोंढाणा गड राखला होता. ‘गड आला पण सिंह गेला’ याचा थरार चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :चिन्मय मांडलेकरमराठी