आपल्या कुटूंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणे हा एकच ध्यास लागलेल्या आणि अशा वेळी आपल्या कुटुंबियांसोबत”प्रेमाचे” दोन शब्द बोलण्याकरिता केवळ काही क्षण असलेल्या एका सामान्य माणसाची कथा म्हणजे ‘काही क्षण प्रेमाचे’. ज्योती प्रकाश फिल्म्स निर्मितीसंस्थेअंतर्गत हरिश्चंद्र गुप्ता निर्मित आणि डॉ. राज माने दिग्दर्शित ‘काही क्षण प्रेमाचे’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. ह्या चित्रपटात सध्या मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलेला सुबोध भावे आणि भार्गवी चिरमुले मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
ही गोष्ट आहे अशा सामान्य माणसाची जो आपल्या प्रेमळ, प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्तीमुळे आपल्या आसपासच्या लोकांबरोबरच कामामध्ये आपल्या कंपनी मालकाचेही मन जिंकतो. मात्र त्याची हीच वृत्ती त्याचा घात करते आणि म्हणतात ना, सध्याच्या कलियुगात दुस-याचे यश आणि सूख पाहावत नाही. तसच काहीसं सुंदर शिंदे म्हणजेच सुबोधच्या आयुष्यात घडतं आणि सुरु होतो सुबोधचा खडतर प्रवास. हा प्रवास नेमका काय असेल, ह्यात त्याला कोणकोणते चांगले अथवा वाईट अनुभव येतात आणि ह्यात कोणकोणत्या व्यक्तींसोबत तो काही क्षण प्रेमाचे घालवतो, हा संपूर्ण प्रवास आपल्याला ह्या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
ह्या चित्रपटात सुबोध-भार्गवीसोबत विजू खोटे, जयराम नायर, मनोज टाकणे, मैथली वारंग, डॉ. छाया माने, ऍड. प्रशांत भेलांडे, जोती निसाळ, डॉ. विलास उजवणे, नरेश ठाकूर, नरेंद्र भोईर, कमलाकर पाटील, नामदेव पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच ऋषी लोकरे, हंसिका माने, काव्या पाटील, शिवम यादव यात बालकलाकार म्हणून दिसणार आहेत. तसेच चित्रपटाचे छायांकन जितेंद्र आचरेकर यांनी केले आहे. अशोक पत्की ह्या चित्रपटाचे संगीतकार असून खुद्द सुरेश वाडकर, देवकी पंडित, श्रद्धा वानखेडे, शेफाली यांनी यातील काही गाणी स्वरबद्ध केली आहे. तर प्रवीण दवणे आणि राज माने ह्या गाण्याचे गीतकार आहेत.