मराठमोळा अभिनेता सुबोध भावे सध्या त्याच्या 'संगीत मानापमान' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात सुबोध भावेने धैर्यधराची भूमिका साकारली आहे. इतकंच नव्हे 'संगीत मानापमान'च्या दिग्दर्शनाची धुराही सुबोधने सांभाळली आहे. 'संगीत मानापमान' सिनेमाच्या निमित्ताने सुबोधच्या आयुष्यात एक खास योग जुळुन आलाय. याविषयी सुबोधने सोशल मीडियावर त्याचा खास अनुभव सांगितला आहे.
सुबोधच्या आयुष्यात घडला खास योग
सुबोध भावेने सोशल मीडियावर लिहिलंय की, "एक अपूर्व योग! २०१० साली आलेल्या " बालगंधर्व" या चित्रपटात मी " भामिनी " साकारली होती. आणि २०२५ साली आलेल्या " संगीत मानापमान " या चित्रपटात मी " धैर्यधर" साकारला. "नाही मी बोलत " आणि "रवी मी " ही दोन गाणी माझ्यावर एकाच नाटकातल्या दोन वेगळ्या भूमिकेत चित्रित झाली. बाप्पाचे आशिर्वाद." अशाप्रकारे सुबोधने खास गोष्ट शेअर केलीय.
सुबोधच्या संगीत मानापमानची चर्चा
अभिनेता सुबोध भावेचे गेल्या दोन महिन्यात 'संगीत मानापमान' आणि 'हॅशटॅग तदैव लग्नम' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सध्या सुबोध भावे दिग्दर्शित 'संगीत मानापमान' सिनेमा थिएटरमध्ये हाउसफुल्ल प्रतिसादात सुरु आहे. या सिनेमात सुबोधसोबत वैदेही परशुरामी, सुमीत राघवन, उपेंद्र लिमये, शैलेश दातार, नीना कुळकर्णी, निवेदिता सराफ हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.