सुबोध भावे दिग्दर्शित 'संगीत मानापमान' सिनेमाची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. कट्यार काळजात घुसलीनंतर सुबोध भावे 'संगीत मानापमान'च्या निमित्ताने दुसऱ्यांदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. 'संगीत मानापमान'च्या निमित्ताने एका मुलाखतीत सुबोध भावेने त्याला अभिनय करण्यापेक्षा कोणत्या गोष्टीत जास्त रस आहे, याचा खुलासा केला. सुबोध भावेने स्पष्टपणे मनातली गोष्ट उघड केली.
सुबोध भावे अमोर परचुरेंच्या कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, "मला सेटवर आरडाओरडा, शिवीगाळ असं उगीच वातावरण असलं की फार आवडत नाही तिथे काम करायला. कारण नाटकाची शिकवण आपल्यावर अशी आहे की, ही एक सामूहिक कला आहे. एका माणसाच्या जीवावर कोणतीही कला होत नाही. जेव्हा सगळेजण एकत्र येतात तेव्हाच ती कलाकृती घडते. माझी सुरुवातच अभिनेता म्हणून झालेली नाहीये. माझी सुरुवात बॅकस्टेज करण्यापासून झालीय. अभिनय येत नाही म्हणून नाटकातून काढलेलं तेव्हा ३ वर्ष मी म्यूझिक ऑपरेट करत होतो, लाईट्स ऑपरेट करत होतो. सगळं केलंय मी आणि मला त्यात प्रचंड आनंद आहे."
"म्हणजे आजही मला लोकांनी विचारलं की तुला अभिनय करायला आवडेल की प्रॉडक्शन सांभाळायला आवडेल? तर मी म्हणेल मला प्रॉडक्शन सांभाळायला आवडेल. तर, मला आनंद त्या कलेच्या परिघात राहण्याचा आहे. मग ती भूमिका कुठलीही असो. मग ती दिग्दर्शकाची भूमिका असो प्रॉडक्शनवाल्याची, बॅकस्टेजवाल्याची किंवा अभिनेत्याची असो. माझ्यासाठी ती गोष्ट इतकी महत्वाची नाहीये. मला त्या परिघात राहायचंय."
"ही गोष्ट कदाचित नाटकाने शिकवली असल्याने त्या विभागाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक माणसाची किंमत मला माहितीये. हा सुबोध भावेचा सिनेमा नाही. हा 'संगीत मानापमान' टीमचा सिनेमा आहे." अशाप्रकारे सुबोधने त्याचं मत मांडलं. सुबोध भावेचा 'संगीत मानपमान' सिनेमा १० जानेवारीला रिलीज होतोय.