Join us

'खूप अभिमान वाटला...', सुबोध भावेनं महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुलेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 4:43 PM

अभिनेता सुबोध भावेनं समीरसाठी एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सुबोधनं समीरचं कौतुक केलं आहे.

मराठी कलाविश्वात आज असे काही कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे समीर चौगुले. उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीमुळे हा अभिनेता आज घराघरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा समीर प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो. सोशल मीडियावर समीरचा मोठा चाहता वर्ग आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेनं (Subodh Bhave) नुकतीच समीरसाठी एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सुबोधनं समीरचं कौतुक केलं आहे. 

सुबोधनं सोशल मीडियावर एका रांगोळीचा फोटो शेअर केला आहे. या रांगोळीमध्ये एक बाजूला समीर तर दुसऱ्या बाजूला चार्ली चॅपलिन दिसत आहे. ही रांगोळी समीरच्याच एक चाहत्याने काढली आहे. हा फोटो शेअर करताना सुबोधनं कॅप्शनमध्ये लिहिले, समीर मित्रा ही रांगोळी बघून खूप अभिमान वाटला तुझा.आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात तुझा सिंहाचा वाटा आहे.खूप प्रेम. सुबोधची या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. कलाकाराने कलाकारास दिलेली कौतुकाची पोचपावती. दादा अभिनंदन, चाहत्यांच्या या प्रेमासाठी खूप अभिनंदन व शुभेच्छा आणि कायमच इतरांचे खुल्या दिलाने कौतुक करण्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक. अशा कमेंट्स सुबोधच्या या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत.    

दरम्यान अभिनेता समीर चौगुले हा आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा त्याची चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे पडद्यावर वावरणारा हा कलाकार खऱ्या आयुष्यातही अत्यंत साधा आहे. त्यामुळे त्याच्या याच साधेपणामुळे त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

टॅग्स :सुबोध भावे समीर चौगुलेमहाराष्ट्राची हास्य जत्रा