बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाचे रहस्य आणखी गडद झाले असताना आता भाजपा नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या एका ट्विटने खळबळ माजली आहे. सुशांतची हत्याच झाली असावी, असा संशय स्वामींनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केला आहे. ‘मला असं का वाटतंय की सुशांतची हत्याच झाली आहे,’ असे ट्विट स्वामी यांनी केले आहे. सोबत कागदपत्रदेखील शेअर केले आहेत. या कागदपत्रांच्या माध्यमातून त्यांनी अशा काही गोष्टींकडे लक्ष वेधले आहे, जे सुशांतच्या हत्येकडे इशारा करते. स्वामींनी एकूण 26 बाबी अधोरेखित केल्या आहेत. यापैकी केवळ दोन बिंदू आत्महत्या दर्शवतात. तर उर्वरित 24 बिंदूंवर नजर टाकली तर त्यातून सुशांतची हत्या झाल्याची शक्यता बळावते.
स्वामींच्या मते, सुशांतच्या रूममध्ये ज्या अॅण्टी डिप्रेशन ड्रग्स मिळाल्यात त्या होऊ शकते अन्य कुणी तिथे ठेवल्या असाव्यात. सुशांतने गळफासासाठी वापरलेल्या कापडावरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. स्वामींच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या गळ्यावरच्या खुणा बेल्टसारख्या कुठल्याशा वस्तूच्या आहेत. सुशांत गळफास घेतला त्या दिवशी तो व्हिडीओ गेम खेळत होता असे म्हटले जाते. स्वामींचे मानाल तर डिप्रेशनमध्ये असलेली कुठलीही व्यक्ति असा व्हिडीओ गेम खेळू शकत नाही. सुशांतच्या खोलीत सुसाईड नोट न मिळणे स्वामींना खटकते आहे. एकंदर त्यांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अनेक दावे केले आहेत. आता यापैकी किती खरे आणि किती खोटे हे पोलिसांच्या तपासाचा भाग आहे.
स्वामींनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. याप्रकरणी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केली.