प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती (suchitra krishnamoorthi) यांनी १२ वर्ष संसार केल्यानंतर निर्माता शेखर कपूर यांना घटस्फोट दिला आहे. १९९९ मध्ये ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाले. मात्र, २०२० मध्ये या दोघांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरु झाला आहे. त्यामुळे ही जोडी सध्या चर्चेत येत आहे. यात अलिकडेच सुचित्राने सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने शेखर कपूरवर गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर घरातल्यांचा विरोध असतानाही शेखरसोबत लग्न केल्याचा पश्चाताप होत असल्याचं तिने म्हटलं आहे.
“मी अभिनय करावं अशी शेखरची अजिबात इच्छा नव्हती. मुळात हा माझ्यासाठी हा फार मोठा विषय नव्हता. कारण, माझी पार्श्वभूमी फिल्म इंडस्ट्रीची नव्हती. पण, शाळा, कॉलेजमध्ये असल्यापासून मला सिनेमाच्या ऑफर्स यायच्या. कॉलेजमध्ये असताना मला कभी हा कभी ना या सिनेमाची ऑफर मिळाली. मी त्यात अभिनय केलाही पण माझ्या आई-वडिलांना ते बिल्कूल आवडलं नव्हतं. मी त्यांच्याशी खोटं बोलून कोचीला शुटिंगसाठी गेले होते", असं सुचित्रा म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "शेखर कपूरसोबत लग्न करायचं हे माझं स्वप्न होतं. मी १०-१२ वर्षांची असताना मला सारखं वाटायचं एकतर मी इम्रान खान किंवा शेखर कपूर या दोघांपैकी एकासोबत लग्न करावं. चॅम्पियन सिनेमाच्या सेटवर आमची भेट झाली आणि हळूहळू मैत्री वाढली. मी त्यांच्या प्रेमात पडले होते. पण, त्यांचं माझ्यावर प्रेम नव्हतं. खरे, जर तुम्ही माझ्याशी लग्न केलं नाहीत. तर मी पुन्हा तुम्हाला कधीच भेटणार नाही अशी धमकी दिली आणि आमचं लग्न झालं."
आईचा होता लग्नाला विरोध "शेखरसोबत मी लग्न केलं. मात्र, माझ्या आई-वडिलांचा याला कडाडून विरोध होता. कारण, लग्नाच्या वेळी शेखरचं वय माझ्या आईएवढं होतं. त्यात त्याचा घटस्फोट झाला होता.आईने अक्षरश: माझ्याकडे विनंती केली होती की त्या माणसाशी लग्न करू नको. पण मी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे नंतर जे काय घडलं ते मी स्वत: ओढवून घेतलं होतं”, असं तिने पुढे सांगितलं.
दरम्यान, सुचित्रा कृष्णमुर्ती यांनी वयाच्या २२ व्या वर्षी शेखर कपूरसोबत लग्न केलं. लग्नाच्या पहिल्या वर्षापासूनच दोघांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या.