90 च्या दशकात मोठ्या पडद्यावर कायम चर्चेत राहणारा एक चेहरा म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना सुधा चंद्रन (Sudha Chandran) यांचा. सुधा सध्या चर्चेत आहेत, ते त्यांच्या एका व्हिडीओमुळे. होय, इन्स्टाग्रामवर सुधा यांनी एक व्हिडीओ शेअर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं घातलं आहे. आता ही काय भानगड आहे तर तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.सुधा जेव्हाकेव्हा विमान प्रवास करतात, तेव्हा तेव्हा सुरक्षा कारणास्तव त्यांना रोखलं जातं. वारंवार त्यांचा कृत्रिम पाय उतरवून त्यांची चेकिंग केली जाते. तुम्हाला ठाऊक असेलच की, 1981 मध्ये वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी सुधा यांना एक अपघात झाला व त्यात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला होता. परंतु जिद्द न सोडता त्यांनी ‘जयपूर फूट’ लावून घेतला होता आणि नव्या उमेदीने नृत्य करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून याच कृत्रिम पायाच्या मदतीने त्या चालतात, नृत्य करतात. हा कृत्रिम पाय उतरवण्याची प्रक्रिया अतिशय वेदनादायी असते. परंतु विमानतळावर प्रत्येकदा त्यांना हा कृत्रिम पाय उतरवण्यास सांगितलं जातं. त्या प्रत्येकदा ईटीडीचा (स्फोटक ट्रेस डिटेक्टर) वापर करण्याची विनंती करतात. पण याचा फायदा होत नाही.सुधा चंद्रन यांनी याच पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
यात त्या म्हणतात,‘ या व्हिडीओच्या निमित्ताने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करू इच्छिते. राज्य आणि केंद्र सरकार दोन्हींना मी आवाहन करून इच्छिते. मी सुधा चंद्रन आहे. प्रोफेशनल डान्स आणि अॅक्ट्रेस आहे. मी आर्टिफिशिअल लिंबच्या मदतीने डान्स करून इतिहास रचला. पण जेव्हा केव्हा मी कामासाठी विमान प्रवास करते, तेव्हा तेव्हा मला एअरपोर्टवर रोखलं जातं. माझ्या कृत्रिम पायला ईटीडीने चेक करा, असा आग्रह मी सुरक्षा रक्षकांना करते. पण त्यांना मी कृत्रिम पाय काढून दाखवायला हवा असतो. मोदीजी, मी तुम्हाला विनंती करते, की वरिष्ठ नागरिकांना एक कार्ड द्या. यावर ते वरिष्ठ नागरिक आहेत, स्पेशली चॅलेंज्ड आहे, हे लिहिलं असावं. मी वारंवार माझा कृत्रिम अवयव काढून दाखवणे, खरोखर लाजीरवाणी बाब आहे.’