फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणाचा पाठिंबा असो वा नसो करिअरसाठी झगडावं लागतं. स्वतःचं स्थान भक्कम करण्यासाठी अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. एवढंच नाही तर, काही जण कास्टिंग काउचलादेखील बळी पडतात. कलाकारांनी याबाबतीतले आपले भयंकर अनुभव प्रेक्षकांसोबत अनेकदा शेअर केले आहेत. टीव्हीच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने धक्कादायक खुलासा करत करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कास्टिंग काउचला बळी पडल्याचे सांगितले आहे. यासोबतच वयाच्या १२ व्या वर्षी त्याच्यासोबत वाईट घटना घडली होती.
अलीकडेच सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीत अभिनेता सुधांशू पांडेने त्याच्यासोबत बालपणी घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. सुधांशू पांडे म्हणाला, 'मी फक्त १२ वर्षांचा होतो, तेव्हा मला लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता. मी एका फॅमिली फ्रेंडच्या लग्नाला गेलो होतो, तिथे मी एका डॉक्टरला भेटलो. अल्पावधीतच माझी त्या डॉक्टरांशी छान ओळख झाली. काही वेळाने त्या डॉक्टरने मला वाईट हेतूने खोलीत बोलावून माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पण, मला त्याचा हेतू लक्षात आला आणि मी तेथून पळ काढला'.
सुधांशू पांडे हा 'अनुपमा' या लोकप्रिय टीव्ही शोचा 'वनराज' आहे. 'अनुपमा' या शोमध्ये वनराज शाहची भूमिका साकारून तो घराघरात लोकप्रिय झाला आहे. यासोबतच सुधांशूने या मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काउचचा खुलासा केला. मुलाखतीत अभिनेत्यानं सांगितलं, 'मलाही कास्टिंग काउचचा बळी व्हावे लागले होते. इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने तडजोड करण्याचा पर्याय दिला होता, परंतु मी तसे करण्यास स्पष्टपणे नकार दिला. मी अशा लोकांच्या फंद्यात पडत नाही. जर, कोणी तडजोड करण्यास सांगितले तर मी स्पष्टपणे नकार देतो. इंडस्ट्रीमध्ये स्टार्सकडून कोणत्याही परिस्थितीत ॲडजस्ट करणे अपेक्षित असते. इथे एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे की काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते. परंतु माझा या म्हणीवर अजिबात विश्वास नाही'.
सुधांशू पांडेने ९० च्या दशकात मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली होती. त्याचा पहिला टेलिव्हिजन शो 'कन्यादान' हा 1998 मध्ये प्रसारित झाला होता. तर पहिला चित्रपट 'खिलाडी 420' होता. या सिनेमता तो अक्षय कुमारसोबत सह-मुख्य भूमिकेत होता. यासोबतच तो भारतातील पहिल्या म्युझिक बँड 'ए बँड ऑफ बॉईज' चा भागही होता. नंतर 2005 मध्ये, सुधांशूने आर्थिक कारणांमुळे बँड सोडला. सुधांशू पांडेचे लग्न मोना पांडेशी झाले असून त्यांना निर्वाण आणि विवान पांडे ही दोन मुले आहेत.