महाठग सुकेश चंद्रशेखरने आता करण जोहरला पत्र लिहिलं आहे. सुकेशने धर्मा प्रॉडक्शनचे शेअर्स खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पत्रात त्याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचाही उल्लेख केला आहे. तो हा व्यवहार ४८ तासांत रोख रक्कम देऊन करू शकतो आणि त्याला धर्मा प्रॉडक्शनमधील ५०-७० टक्के हिस्सा खरेदी करायचा आहे, असं म्हटलं आहे. करण जोहर खूप चांगला माणूस आहे आणि माझं प्रेम असलेल्या जॅकलीनच्या मनात निर्माता-दिग्दर्शकाबद्दल खूप आदर आहे म्हणून हे करत असल्याचं सुकेशने आपल्या पत्रात म्हटलं आहे.
सुकेश चंद्रशेखरने हे 'लेटर ऑफ इंटेंट' लीगल फर्म अनंतमच्या माध्यमातून धर्मा प्रॉडक्शन आणि करण जोहरला पाठवलं आहे. त्यावर लिहिलं आहे, तुम्ही तुमची कंपनी धर्मा प्रोडक्शनसाठी गुंतवणूकदार शोधत आहात. माझ्या आर्थिक सल्लागाराने मला सांगितलं की धर्मा प्रॉडक्शनने यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांशी चर्चा केली आहे. माझी कंपनी एलएस होल्डिंग्स ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये नोंदणीकृत आहे. आम्हाला ऑनलाइन गेमिंग, मायनिंग, कॉर्पोरेट कनेक्शनमध्ये स्वारस्य आहे.
सुकेशने पुढे सांगितलं की, आंतरराष्ट्रीय घडामोडी, हॉस्पिटॅलिटी आणि लायजिंगमधून त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे ६३०० कोटी रुपये आहे. याशिवाय एलएस होल्डिंग्सकडे एक चित्रपट निर्मिती आणि वित्त कंपनी देखील आहे. एलएस फिल्म कॉर्प नावाच्या माझ्या कंपनीने ७० हून अधिक चित्रपटांना निधी दिला आहे. यात दक्षिण चित्रपट आणि OTT कंटेंट देखील आहे. आजच्या काळात निर्मिती/चित्रपट व्यवसाय मोठ्या प्रमाणावर नेणं आवश्यक आहे.
सुकेशने म्हटलं की, त्याच्यासाठी चित्रपट हा व्यवसाय नसून एक पॅशन आहे. याचं कारण म्हणजे त्याला स्वतःला चित्रपटांची खूप आवड आहे. आपल्यावर अनेक आरोप झाले असले तरी आमचा व्यवसाय बेकायदेशीर नाही. आम्ही इन्कम टॅक्सच्या नियमांचं पूर्णपणे पालन करतो. माझ्यावर ज्या काही केसेस आहेत, त्या राजकीय हेतूने प्रेरित आहेत. खोट्या आहेत.
मी आणि माझं कुटुंब धर्मा प्रॉडक्शनचे मोठे चाहते आहोत. विशेषतः करण जोहर, कारण तो एक अद्भुत व्यक्ती आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यातील प्रेम जॅकलिनला तुझ्याबद्दल खूप आदर आहे. अशा परिस्थितीत, तुमची कंपनी धर्मा प्रॉडक्शनमध्ये गुंतवणूक करणे हे आमच्या कंपनीच्या सौभाग्याची गोष्ट आहे असंही सुकेशने पत्रात म्हटलं आहे.
सुकेश चंद्रशेखरने असाही दावा केला आहे की, जर हे डील झालं तर ते धर्मा प्रॉडक्शनमधील ५० ते ७० टक्के हिस्सेदारी खरेदी करू इच्छित आहे. तसेच, या चर्चेनंतर ४८ तासांच्या आत संपूर्ण व्यवहार रोखीने केला जाईल. इथे भारतात सर्वकाही होईल. माझे लीगल टीम, माझे सल्लागार आणि माझे बँकर्स तुमच्या टीमसोबत सर्व कागदपत्रे करतील असंही सुकेशने म्हटलं आहे.