ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - अनुराग कश्यपचा 'उडता पंजाब' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच ऑनलाइन लीक झाल्याची घटना ताजी असतानाच बॉलिवूडचा दंबग स्टार सलमान खान याचा बहुप्रितक्षित 'सुलतान' चित्रपटही ऑनलाइन लीक झाल्याचे वृत्त ' टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच आज सुलतान देशभरात प्रदर्शित होत आहे, मात्र चित्रपट प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच ऑनलाइन लीक झाला आहे.
सायबर-क्राइम एक्सपर्ट दीपक शंकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून या चित्रपटाची कॉपी डार्कनेटवर उपलब्ध झाली असून लवकरच हा चित्रपट टॉरंटवरही उपलब्ध होईल असे सांगितले. यशराज फिल्मस्ने मात्र चित्रपट लीक झाल्याचे हे वृत्त फेटाळले आहे.
आणखी वाचा :
यापूर्वी बहुचर्चित उडता पंजाबची सेन्सॉर कॉपीच लीक झाली होती तसेच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात धुमाकूळ घालणा-या नागराज मंजुळेचा 'सैराट' चित्रपटही पायरसीच्या दुष्टचक्रातून सुटू शकला नाही. यू ट्यूबवर चित्रपटाची सेन्सॉर कॉपी अपलोड झाली. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना याची माहिती मिळताच त्यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊन रीतसर तक्रार दाखल केली होती.