Join us

सुमन कल्याणपूरांचा भव्य सत्कार

By admin | Published: May 14, 2017 1:18 AM

संगीत रसिकांच्या हृदयात सुमन कल्याणपूर या गायिकेला विशेष स्थान आहे.

अमरेंद्र धनेश्वरसंगीत रसिकांच्या हृदयात सुमन कल्याणपूर या गायिकेला विशेष स्थान आहे. अत्यंत सुरेल गळा आणि अतिशय गोड आवाजाची देणगी लाभलेल्या या गायिकेने पार्श्वगायनाच्या आणि भावसंगीताच्या क्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी बजावली. त्यांची शेकडो गाणी रसिकांच्या मनात आणि ओठावर आहेत. हिंदी चित्रपटसृष्टी तर त्यांनी गाजविलीच परंतु त्यांची मराठी भावगीते आणि भक्तिगीतेही रसिकांच्या चिरकाल स्मरणात राहणार आहेत. चित्रपटसृष्टीतल्या उबग आणणाऱ्या राजकारणामुळे १९८० च्या दशकात त्या प्रकाशझोतापासून दूर राहिल्या पण त्यांच्या निर्मळ आणि पारदर्शक आवाजाची आठवण रसिकांच्या मनात ताजीच राहिली.म्हणूनच ‘सा’ क्रिएशन्सने आयोजित केलेल्या षण्मुखानंद सभागृहातल्या त्यांच्या सत्काराला रसिकांनी, गानप्रेमींनी एकच गर्दी केली होती. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, बासरीसम्राट हरिप्रसाद चौरसिया, संगीत दिग्दर्शक यशवंत देव, निवेदक अमीन सयानी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार इत्यादी मान्यवरांनी सत्कार समारंभाला उपस्थित राहून सुमन कल्याणपूरांना आपल्या सुमधुर आवाजात गाणी गाऊन श्रोत्यांना आनंदित केले. त्यांच्या आवाजामुळे अजरामर झालेली गाणी गाण्यासाठी अभिजित, साधना सरगम, उत्तरा केळकर, मंदार आपटे, विद्या करंलगाकर, अर्चना मुग्धा, आर्या, माधुरी करमरकर इत्यादी गायक कलाकारांनी आनंद सहस्रबुद्धे यांच्या संगीत संयोजनाखाली सादर केली. ‘रॉयल्टी’च्या प्रश्नावरून महंमद रफी आणि लता मंगेशकर यांच्यात मतभेद झाल्यानंतर सुमारे तीन वर्षांत एकत्र गात नव्हते. त्यामुळे अनेक संगीत दिग्दर्शकांना सुमन कल्याणपूरांकडे धाव घ्यावी लागली आणि सुमनतार्इंनी या गीतांचे अक्षरश: सोने केले. किती गाणी आठवावीत? ‘आज केल तेरे मेरे प्यार के चर्चे, ‘तुमने पुकारा और हम चले आये’, ‘न तुम हमे जानो’, ‘जुही की कली मेरी लाडली’ ही काही मासलेवाईक गाणी, यमन रागावर आधारित ‘दिल-ए-बेताबको सीनेसे’, जिथे सागरा धरणी मिळते, सिंधू भैरवीमधील ‘अजहुं न आय बालमा’, जोगियामधील ‘दिल एक मंदिर’, ‘अभोगी’तले मृदुल करांनी छेडित तारा, ‘दरबारी’तले दिनरात तुला मी किती स्मरू? ही रागदारीवर आधारलेली गाणी अक्षरश: चिरकाल टिकणारी आहेत. श्रोत्यांनी सुमनतार्इंना अभूतपूर्व सलामी दिली.