आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर एक ना अनेक आरोप केले आहेत. या सर्व आरोपांवर उत्तर देण्यासाठी समीर वानखेडे यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर मैदानात उतरली आहे. काही अपवाद सोडले तर या प्रकरणावर मराठी इंडस्ट्रीतील कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. पण आता या प्रकरणाच्या संदर्भाने लोकप्रिय लेखिका शेफाली वैद्य आणि मराठमोळा अभिनेता सुमित राघवन (Sumeet Raghvan) यांच्या ट्वीटरवर चांगलीच जुंपली आहे.या ट्वीटर वॉरची सुरुवात झाली ती सुमित राघवनची पत्न चिन्मयी सुमित (ChinmayeeSumeet) हिच्या एका पोस्टने. मला अनावर इच्छा झाली होती, एखादी सणसणीत पोस्ट टाकायची. पण ती ‘टिकली’नाही, अशी पोस्ट चिन्मयीने लगावला होता.तिच्या या बोच-या पोस्टवर शेफाली वैद्य (Shefali Vaidya) यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत चिन्मयीला चांगलंच सुनावलं होतं. ते टिकलीचं राहू द्या, पण थोडा सणसणीतपणा जरा क्रांती रेडकरबद्दल दाखवा की, की त्या विषयावर बोलताना धडधडीत शेपूट घातली? असा सवाल त्यांनी केला होता. शेफालींच्या या प्रत्त्युतरावरूनच सुमित राघवन संतापला आहे. शेफाली वैद्य यांनी अलीकडे वर्तमानपत्रातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची टिकली न लावलेली जाहिरात पाहिली आणि त्याचा विरोध केला होता. हिंदूंच्या कोणत्याही सणात विवाहित स्त्रिया असूदेत किंवा लहान मुली असुदे टिकली लावून सण साजरे करतात. परंतु, जाहिरातीत मॉडेलच्या कपाळावर टिकली नव्हती. तरीही ती दिवाळीसाठीच्या दागिन्यांची जाहिरात करत होती. त्यामुळे शेफाली यांनी आवाज उठवत ‘नो टिकली, नो बिसनेस’ हा हॅशटॅग सुरू केला आणि बघता बघता हा हॅशटॅग प्रचंड लोकप्रिय झाला होता. या हॅशटॅगद्वारे शेफाली यांनी हिंदूंच्या सणांच्यावेळी आपलं सामान खपवण्यासाठी ब्रॅण्ड ज्या मॉडेल्स दाखवतात त्यावर आक्षेप घेतला होता.
सुमित राघवनची पोस्ट
काही दिवसांपूर्वी क्रांतीला असभ्य भाषेला सामोरं जावं लागलं आणि त्याबद्दल मी ट्विट केलं होतं आणि क्रांतीला पूर्ण पाठिंबा दिला होता. काल पासून माझ्या बायकोला देखील तशाच भाषेला तोंड द्यावं लागतंय. कारण शेफाली वैद्य ताई, तुम्ही चिन्मयीच्या एका पोस्टला भलतंच वळण दिलं. दुसरी गोष्ट, कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. शिवाय जी भाषा तुम्ही स्वत: चिन्मयीसाठी वापरली आहे ती आक्षेपार्ह आहे. शेफाली ताई,मी एवढंच म्हणू इच्छितो. काल तुमच्या अनुयायांनी अतिशय घाणेरड्या भाषेचा प्रयोग करून तिला प्रचंड त्रास दिलाय. क्रांती बद्दल कळवळा आहे ते बरोबरच आहे परंतु तुम्ही एका शब्दाने चिन्मयीसाठी तुमच्या अनुयायांनी केलेल्या असभ्य भाषेचा निषेध केला का? काय फरक आहे मग तुमच्यात आणि क्रांतीला ट्रोल करणा-यांमध्ये? विचारसरणी आणि मुद्दे वेगळे असू शकतात ताई. हे अपमानास्पद आणि निषेधार्ह आहे,’ अशी पोस्ट सुमित राघवन याने केली आहे.
शेफाली वैद्य यांची फेसबुक पोस्ट
काल मी चिन्मयी सुमीत हयांची माझे नाव न घेता माझ्यावर टीका करणारी एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर बराच गदारोळ झाला. त्यानंतर आपल्या असहाय्य पत्नीच्या सहाय्याला स्वत: सुमीत राघवन धावून आले. त्यांच्या ह्या पत्नीपरायणतेबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. सगळ्यांना कळावं म्हणून त्यांची कॉमेंट इथे देत आहे. त्यांचा मुख्य मुद्दा होता, नुकतेच त्यांच्या पत्नीचे वडील गेले त्यामुळे त्या बिघडलेल्या मन:स्थितीत आहेत म्हणून त्यांनी माझ्यावर नाव न घेता काहीही टीका केली तरी मी ती मनावर नाही घ्यायला पाहिजे.
आता राघवन दांपत्य काही शाहरुख खान वगैरे नाहीयेत की ज्यांच्या कौटुंबिक अपडेट्स आपल्याला इच्छा नसली तरी पाहावेच लागतात. त्यांच्या घरात काय झालं ते मला कळायची शक्यताच नव्हती कारण मी दोघांनाही फॉलो करत नाही. ही चिन्मयीची पोस्ट मला दिसली तीही कुणी तरी इनबॉक्स मध्ये पाठवलं म्हणून. त्यात त्यांनी मला टॅग करून टीका केली असती तरी मी विषय सोडून दिला असता. पण नाव न घेता टीका करणा-या लोकांबद्दल मला आदर नाही. तरीही मी समजू शकते की वडील गेल्याच्या दु:खात माणसं सैरभैर होतात, आणि काहीबाही लिहू शकतात.
त्यामुळे चिन्मयी सुमित ह्यांच्या भावनांचा आदर राखून मी माझी पोस्ट डिलीट करते आणि माझ्यापुरता हा वाद संपवते. फक्त माझी सुमित राघवन ह्यांना विनंती आहे की त्यांनी चिन्मयी राघवन ह्यांना सांगावं की,ह्याापुढे माझ्यावर नाव न घेता त्यांना कुजकट टीका करावीशी वाटली तर त्यांनी आज जसं केलंय तशी स्वत:च्या भिंतीवरचे कॉमेंट आधी बंद करून आणि मला ब्लॉक करून करावी म्हणजे काय होईल, टीका माझ्यापर्यंत पोचणारच नाही आणि मग त्यांचा आपल्या पत्नीच्या सहाय्याला धावून यायचा आणि दर वेळेला नवे व्हिक्टिम कार्ड शोधायचा त्रास तरी वाचेल!