अभिनेता सुमीत राघवन ( Sumeet Raghvan ) हा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय मुद्यांवर तो परखड मत मांडत असतो. सध्या सुमीतची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये त्याने मुंबई पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सध्या मुंबईतील एका स्कूलबस चालकाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा बस चालक रस्ताच्या विरुद्ध दिशेने स्कूलबस घेऊन जात असल्याचं व्हिडीओत दिसतंय. हा व्हिडीओ शेअर करत, सुमीत राघवनने संताप व्यक्त केला आहे.
संबंधित बस चालकाचा व्हिडीओ रिट्वीट करत त्याने संतप्त ट्वीट केलं आहे.‘मुंबई पोलिस, कृपा करून भीती निर्माण होईल ड्रायव्हर्सच्या मनात असं काहीतरी करा. हे अती झालंय. तुमच्याबद्दल यांच्या मनात आदर नाहीच आहे हे उघड आहे, भीती देखील नाही आहे. तर निदान भीती निर्माण करा कारण त्याशिवाय काही खरं नाही,’ असं सुमीतने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
ट्राफिकच्या नियमानुसार वाहनं डाव्या बाजुनं चालवली जातात. मात्र संबंधित स्कूल बसचा चालक उलट दिशेने बस चालवून विद्यार्थ्यांसह रस्त्यावरील इतरांच्या जीव धोक्यात टाकतो आहे. याबद्दल सुमीतने संताप व्यक्त केला आहे.
सुमीत राघवन हा मूळचा मुंबईचा असून तो एक वॉईस ओव्हर आर्टिस्ट आहे. सुमितने आपल्या करिअरची सुरुवात 1983 पासून केली. सुमितचे बाबा तमिळ आणि आई कानडी होती. अशा दोन वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि तो मोठा झाला. लहानपणापासूनच त्याला गाण्याची आवड होती. त्याने पंडित वसंतराव कुलकर्णी आणि सुरेश वाडकर यांच्याकडे गायनाचा प्रशिक्षण घेतले. वयाच्या आठव्या वर्षी सुमितने स्टेजवर परफॉर्म करायला सुरुवात केली.