संपूर्ण जगात सध्या कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे . पण त्याची एक चांगली बाजू सुद्धा आहे ती म्हणजे निसर्ग पृथ्वी स्वतःला रिपेअर करतेय आणि जोपर्यंत हे सुरु आहे तोपर्यंत सर्वांनीच आपापल्या घरी राहणे सुद्धा महत्वाचे आहे. त्यात सिनेमा, सीरिज, काही लोकप्रिय मालिका व लघुपट रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. त्यात आता अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एकत्र आले आहेत. स्ट्रॉबेरी शेक या लघुपटातून एक वेगळी केमिस्ट्री पहायला मिळणार आहे.
'स्ट्राबेरी शेक' ही गोष्ट आहे कूल बाबा आणि त्यांच्या हुशार चिऊची. आजच्या पिढितील प्रत्येक आईबाबांना आणि त्यांच्या पिल्लांना ही गोष्ट त्यांची वाटेल यात शंकाच नाही. जेव्हा एक नॉर्मल बाबा आपल्या चिऊ साठी एक 'कूल' बाबा बनण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची चिऊ म्हणजे मुलगी सरळ तिच्या बॉयफ्रेंडलाच घरी घेऊन बाबा समोर उभी करते तेव्हा त्या 'कूल' बाबाची उडणारी तारांबळ आणि पुढे घडणाऱ्या घटना प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. अभिनेता सुमीत राघवन यांनी हा बाबा अतिशय कमाल रंगवला आहे. त्याचबरोबर अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने एक अतिशय गोड पण त्याचबरोबर स्पष्टवक्ती मुलीचे पात्र खूप सुंदर रित्या दाखवले आहे. लेखक व दिग्दर्शक शोनील यल्लातीकर याची ही व्यवसायिक दुसरी फिल्म असून त्याची विषयावरची घट्ट पकड आणि दिग्दर्शनातील बारकावे या फिल्म मधून प्रेक्षकांना पहायला मिळतील. ऋता च्या बॉय फ्रेंड ची भूमिका रोहित फाळके या गुणी अभिनेत्याने उत्तमरीत्या केली आहे.
तर ऋता दुर्गळे हिने सांगितले की, ही शॉर्टफिल्म निवडताना नाही बोलण्याचा प्रश्न नव्हता. उत्तम गोष्ट , शोनील सारखा एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक , सुमीत सरांसारखे एक दिग्गज अभिनेते तुमच्या समोर असल्यावर एका कलाकाराला आणखी काय हवे ? आणि ' स्ट्राबेरी शेक' ही आजची गोष्ट आहे. आजच्या पिढीला खूप काही सांगायचं आहे, आजच्या पिढी कडे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता आहे. मात्र त्याचबरोबर पालकांची साथ सुद्धा त्यांना हवी आहे. मात्र त्यासाठी सध्या घरात संवाद होत नाहीत. हेच आम्ही या शॉर्टफिल्म द्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.