'इन्फोसिस' कंपनीचे संचालक नारायण मूर्ती (Narayan Murti) यांच्या एका विधानावरुन देशभरात चर्चा रंगली आहे. तरुणांनी आठवड्याला ७० तास काम केलं पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं आणि वाद प्रतिवाद सुरु झाले. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी यावर आपलं मत मांडलं. कोणी या विधानाला विरोध केला तर कोणी पाठिंबाही दिला. आता नुकतंच अभिनेता सुनील शेट्टीने यावर मत व्यक्त केलंय.
अभिनेता आणि उद्योजक सुनील शेट्टीने लिंक्डइनवर मोठी पोस्ट शेअर करत लिहिले, "जेव्हा नारायण मूर्तींसारखे अनुभवी व्यक्ती काही सांगतात तेव्हा लोकांनी ते काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. त्यातून तुम्ही बेस्ट निवडलं पाहिजे. यातून वाद तयार करण्याचं काहीच कारण नाही. प्रत्येकाने याचं आकलन करण्याची गरज आहे. तसंच त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय आहे हे जाऊन घेतलं पाहिजे."
तो पुढे म्हणाला, "त्यांचा उद्देश इतकेच तास काम केलं पाहिजे असा नव्हता. आठवड्यात ७० किंवा १०० तास काम करा असा त्याचा शब्दश: अर्थ होत नाही. मला त्यांचे विचार ऐकून हेच समजलं की आपण आपल्या कंफर्ट झोनमधून बाहेर यावं हे सांगायचा त्यांचा प्रयत्न आहे. अमिताभ बच्चन, विराट कोहली, रतन टाटा आणि अब्दुल कलाम यांनी आपापल्या क्षेत्रात बेस्ट कामगिरी केली आहे. जर हे लोक आपल्या कंफर्ट झोनमध्ये राहिले असते तर इतके पुढे आले असते का? "
आपलं कौशल्य ओळखा, नवीन गोष्टी शिका, प्रेशर हँडल कसं करायचं आणि संधी कशा वाढवायच्या याला तरुणांनी प्राधान्य दिलं पाहिजे. सोबतच कुटुंब, आरोग्य, छंद, मित्र आणि स्वत:साठी वेळ काढणंही गरजेचं आहे. जग खूप लवकर बदलत आहे हेही तितकंच खरं आहे, असंही तो म्हणाला.