संजय दत्त (sanjay dutta) हे नाव आजच्या घडीला कोणासाठीही नवीन नाही. चित्रपट असो वा पर्सनल लाइफ संजय सातत्याने चर्चेत येत असतो. संजय दत्त उत्तम अभिनेत्या असण्यासोबतच एक स्टारकिडदेखील आहे. परंतु, एका दिग्गज अभिनेत्याचा मुलगा असूनही एकेकाळी संजयला सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगावं लागलं आहे. इतकंच नाही तर घरी असंख्य गाड्या असतानाही संजय चक्क लोकल ट्रेनने प्रवास करायचा. परंतु, एका दिग्गज अभिनेत्याचा मुलगा असूनही त्याच्यावरही ही वेळ का आली हे त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
सेलिब्रिटींची मुलं म्हटल्यावर अनेकांचं लक्ष स्टारकिड्सकडे वेधलं असतं. ही मुलं कशी वावरतात, त्यांची लाइफस्टाइल कशी आहे, त्यांचा स्टारडम हे जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. परंतु, संजयच्या बाबतीत हे चित्र थोडं वेगळं होतं. एकीकडे स्टारडम जरी असला तरीदेखील त्याचे पाय जमिनीवर असावेत यासाठी त्याचे वडील दिवंगत अभिनेता सुनील दत्त यांनी त्याला कायम सर्वसामान्य मुलांप्रमाणेच वागणूक दिली. विशेष म्हणजे 'ज्यावेळी स्वत:च्या पायावर उभा राहशील आणि पैसे कमवशील तेव्हाच गाडीत बस. तोपर्यंत घरच्या कार वापरायच्या नाहीत', असं त्यांनी संजयला खडसावून सांगितलं होतं. 'सुपर डान्स 4' या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावलेल्या संजयने त्याचं बालपण कसं गेलं हे सांगितलं.
"मी आणि माझ्या बहिणी, स्टारकिड असूनही आमच्यात नम्रपणा असावा असा माझ्या आई-वडिलांचा कायम आग्रह होता. त्यांनी कधीच आम्हा भावंडांना आपण कोणीतरी मोठे स्टार आहोत हे भासवू दिलं नाही. कायम मोठ्यांचा मान ठेवणे, आदर राखणे हीच शिकवण त्यांनी आम्हाला दिली. घरातील नोकरवर्ग असो वा लहान मुलं प्रत्येकासोबत प्रेमाने आणि आदरानेच वागावं असा त्यांचा अट्टाहास होता. तसंच आपण नर्गिस आणि सुनील दत्त यांची मुलं आहोत ही भावना मनात आणून मोठेपणा मिरवू नये", असंही त्यांनी सांगितलं होतं.
पुढे तो म्हणतो, "माझ्या कॉलेजचा पहिला दिवस होता त्यामुळे मला वाटलं की माझे वडील मला कार घेऊन कॉलेजपर्यंत सोडायला येतील. पण, त्यांनी मला जवळ बोलावलं आणि माझ्या हातावर सेकंड क्लासचा पास ठेवला. हा पास वांद्रे स्टेशनपासून होता. हातात पास ठेवल्यावर मी त्यांच्याकडे कारची मागणी केली. पण त्यांनी नकार दिला. केवळ नकारच नाही तर एक सल्लाही दिला. ज्या दिवशी तू स्वत: कमवायला लागशील त्या दिवशी कारमध्ये बस. आता रिक्षा किंवा कॅबने वांद्रे स्टेशनला जा," असं सांगितलं.
दरम्यान, "त्यावेळी मी चर्चगेटच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये होतो. त्यामुळे मला रोज चर्चगेट स्टेशनवरुन कॉलेजपर्यंत पायीच प्रवास करावा लागायचा. पण, हाच साधेपणा जपण्याचे संस्कार त्यांनी आमच्यावर केले आहेत", असंही तो म्हणाला. संजयने १९८१ मध्ये रॉकी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला. संजयने आतापर्यंत १८७ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.