सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांनी कॉमेडी नाईटस विथ कपिल आणि द कपिल शर्मा शो यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. त्या दोघांचे कॉमिक टायमिंग प्रेक्षकांना चांगलेच भावले होते. या दोघांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. पण द कपिल शर्मा शोच्या एका कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी या चित्रपटाची टीम सिडनीला गेली होती. त्यावेळी परत येताना विमानात सुनील आणि कपिलचे जोरदार भांडण झाले होते. कपिलने या भांडणादरम्यान सुनीलला खूप सुनावले होते. एवढेच नव्हे तर त्याच्यावर हात देखील उगारला होता असे म्हटले जाते. या घटनेनंतर सुनीलने द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाला रामराम ठोकला. प्रेक्षक या कार्यक्रमातील त्यांच्या लाडक्या मन्सुर गुलाटीला प्रचंड मिस करत होते. तसेच कपिलची तब्येत सतत खराब असल्याने या कार्यक्रमाचे चित्रीकरण अनेकवेळा पुढे ढकलण्यात येत होते. त्यामुळे हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय सोनी वाहिनीने घेतला. पण आता कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या फॅन्ससाठी खूप चांगली बातमी आहे.
सुनील आणि कपिलमध्ये झालेला वाद मीडियात चांगलाच गाजला होता. पण आता हे दोघे त्यांचा वाद विसरून एकत्र काम करणार असल्याची चर्चा आहे. सुनील ग्रोव्हरने नुकत्याच पिंकव्हिला या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले आहे की, आम्ही दोघांनी एका खूप चांगल्या कार्यक्रमात एकत्र काम केले होते. या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना आम्ही खळखळून हसवले आहे. मी सध्या काही चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यामुळे भविष्यात मी काय करणार याविषयी अद्याप काहीही सांगू शकत नाही.
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या ट्वीटवरून देखील या दोघांमध्ये सगळे काही आलबेल असल्याचे दिसून येत आहे. सुनीलचा पटाखा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना तो प्रचंड आवडत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी कपिलने ट्वीट करून या चित्रपटासाठी सुनील आणि विशाल भारद्वाज यांना शुभेच्छा दिल्या होत्या. कपिलने ट्वीट केल्यानंतर सुनील ग्रोव्हरने लगेचच रिप्लायद्वारे त्याचे आभार मानले आहेत. त्यामुळे आता ते पुन्हा एकत्र काम करणार याविषयी अंदाज बांधले जात आहेत.