Join us

टोमॅटोच्या वाढत्या दराचा सुनील शेट्टीलाही बसला फटका, म्हणाला, 'आमच्याही घरात...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 4:59 PM

सुनील शेट्टीने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.

Sunil Shetty On Tomato Rate Hike : देशात सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. मध्यमवर्गीय घराघरात गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. पण या महागाईचा केवळ सामान्यांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही फटका बसतो हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. पण टोमॅटोच्या वाढत्या दरांमुळे अभिनेता सुनील शेट्टीही (Sunil Shetty) परेशान झाला आहे आहे. त्याने नुकतेच एका मुलाखतीत हा खुलासा केला. तसंच त्याने खंडाळ्याच्या फार्म हाऊसमध्ये केलेल्या शेतीबद्दलही संवाद साधला.

सुनील शेट्टी म्हणाला, 'आजकाल टोमॅटो दर भलतेच महागले आहेत. याचा परिणाम माझ्या घरातही झाला आहे. म्हणूनच मी टोमॅटो खाणंच कमी केलं आहे. तुम्हाला वाटत असेल मी तर सुपरस्टार आहे. मला या महागाईमुळे काही फरक पडत नसेल. पण हे खोटं आहे. आमच्यावरही महागाईचा परिणाम होतो.'

तो पुढे म्हणाला, 'आम्ही ऑनलाईनच भाज्या ऑर्डर करतो.जर तुम्ही अॅपवर भाज्यांच्या किंमती बघितल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण यावर भाज्या बाजारापेक्षा आणखी स्वस्त मिळतात. मी स्वस्त आहे म्हणून अॅप वरुन ऑर्डर करत नाही तर ते ताज्या भाज्या देतात म्हणून ऑर्डर करतो. या भाज्या कुठून आणल्या आहेत याचीही ते माहिती देतात. तसंच याचा लाभ थेट शेतकऱ्यांनाच होतो.'

सुनील शेट्टीने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. जर सुनील शेट्टीला सुद्धा महागाईचा फटका बसला असेल तर सामान्यांचे काय हाल होत असतील. सध्या टोमॅटोचे भाव 150 रु किलो पर्यंत पोहोचले आहेत. पावसामुळे टोमॅटोची आवक घटली आहे म्हणूनच भाव गगनाला भिडले आहेत.

टॅग्स :सुनील शेट्टीमहागाईभाज्याबॉलिवूड