'गदर-एक प्रेम कथा' (Gadar- Ek Prem Katha) चित्रपट प्रदर्शित होऊन २३ वर्षांचा काळ लोटला आहे. पण आजही या सनी देओल (Sunny Deol) स्टारर सिनेमाची चर्चा आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा(Anil Sharma)च्या या चित्रपटाने हिंदी सिनेमाची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकली आणि गेल्या वर्षी त्याचा सिक्वेल म्हणजेच गदर २ (Gadar 2) ने बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत इतिहास रचला. पण तुम्हाला माहिती आहे का की गदरच्या शूटिंगदरम्यान सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्यासोबत मोठी दुर्घटना घडली होती, ज्यातून ते थोडक्यात बचावले.
एकेकाळी सनी देओल आणि अमिषा पटेल ही जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी जोडी मानली जायची. २००१ साली गदर चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आणि त्या दोघांची केमिस्ट्री लोकांना खूपच भावली. काही वर्षांपूर्वी सनीने लहरे नेटवर्कला मुलाखत दिली होती आणि त्यादरम्यान त्याला गदर-एक प्रेम कथा संदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी त्याने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला.
अपघातातून थोडक्यात बचावलो...
या मुलाखतीत सनी देओलने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात झाल्याचे सांगितले होते. सनी देओल म्हणाला की, आम्ही लखनऊमध्ये गदरचे शूटिंग करत होतो आणि सीनमध्ये मला रिक्षा चालवायची होती, ज्यामध्ये अमिषा पटेल आणि एक लहान मूल रिक्षात बसले होते. रिक्षा चालवत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि रिक्षा समोरील भिंतीला धडकली. त्यामुळे रिक्षा पलटी होऊन आम्ही तिघेही जमिनीवर पडलो. यामध्ये आम्हाला किरकोळ दुखापतही झाली. हे प्रकरण गंभीर झाले नसले तरी देवाने आम्हाला थोडक्यात वाचवले.
लवकरच येणार 'गदर ३' मागील वर्षी रिलीज झालेल्या गदर २च्या प्रचंड यशानंतर या फ्रँचायझीचा तिसरा भाग कधी येणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गदर ३ बद्दल आधीच हिंट दिली आहे आणि आशा आहे की भविष्यात चाहत्यांना तारा सिंग आणि शकिना यांची जोडी पुन्हा पाहायला मिळेल.