सनी देओल, प्रिती झिंटा, अमिषा पटेल आणि अर्शद वारसी यांचा ‘भैय्याजी सुपरहिट’ या चित्रपटाच्या मार्गातील अडचणी कमी व्हायचे चिन्हे नाहीत. होय, दीर्घकाळापासून हा चित्रपट रखडला होता. अलीकडे हा चित्रपट रिलीज होण्याची चिन्हे दिसू लागली होती. १९ आॅक्टोबर ही रिलीज डेटही जाहिर करण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा हा चित्रपट लांबण्याची शक्यता आहे.
होय, मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, ‘भैय्याजी सुपरहिट’च्या निर्मात्या फौजिया अर्शी यांनी चित्रपटाच्या टीमला लीगल नोटीस पाठवले आहे. फौजिया अर्शी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, ‘भैय्याजी सुपरहिट’संदर्भात माझ्याशी २०११ मध्ये संपर्क साधण्यात आला होता. या चित्रपटासाठी आम्ही २४ कोटींचा बजेट ठरवला होता. सरतेशेवटी तो २६ कोटींचा पोहोचला. २०१२ मध्ये चित्रपटाचे एक शेड्यूल संपल्यानंतर चित्रपटाचा बजेट ४० कोटी रूपयांवर पोहोचल्याचे नीरजने मला सांगितले. यानंतर नीरज आणि सनीने माझ्यावर दबाव टाकून चिराग धारिवालसोबत काम करण्याचा आग्रह लावून धरला. चिराग धारिवाल हा चित्रपट प्रोड्यूस करण्यास तयार होता. यास्थितीत माझे पैसे परत करणे अपेक्षित होते. धारिवालने मला ४ कोटींचा चेक दिला, जो बाऊन्स झाला. यानंतर रिलीजवेळी मला १ कोटी रूपये देऊ आणि ‘भैय्याजी सुपरहिट’मध्ये प्रोड्यूसरचे क्रेडिट देऊ, असे वचन मला देण्यात आले. पण तेही झाले नाही. आता याघडीला व्याजासकट मला १० कोटी रूपये मिळायला हवेत.यासंदर्भात चिराग धारिवाल यांनी मात्र वेगळाच दावा केला. त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, चिराग धारिवाल यांनीच हा चित्रपट सुरू केला होता. फौजिया या चित्रपटाशी नंतर जुळल्या.२.५ कोटी रूपये दिल्यानंतर त्यांनी हा चित्रपट टेकओवर केला होता. चित्रपट सुरू झाल्यानंतर त्या केवळ ५ दिवस चित्रपटाशी जुळलेल्या होत्या. यानंतर ‘भैय्याजी सुपरहिट’चा संपूर्ण खर्च चिराग धारिवाल यांनीच उचलला.एकंदर काय तर ‘भैय्याजी सुपरहिट’वरून दोन्ही निर्मात्यांमध्ये तूर्तास जुंपली आहे आणि हा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. या वादामुळे ‘भैय्याजी सुपरहिट’ची रिलीज डेट लांबण्याचीही शक्यता बळावली आहे. आता पुढे काय होते, ते बघूच.