करण जोहरच्या 'कॉफी विद करण 8' (Koffee With Karan 8) चा दुसरा एपिसोड रिलीज झाला आहे. या एपिसोडमध्ये सनी देओल-बॉबी देओल (Sunny Deol-Bobby Deol)या भावांच्या जोडीने हजेरी लावली. तब्बल १८ वर्षांनी ते कॉफी विद करणमध्ये आले. 'गदर 2'मुळे सनी देओलची जादू बॉक्सऑफिसवर परत आली आहे तर बॉबी देओलही 'आश्रम' आणि आगामी 'Animal' सिनेमामुळे चर्चेत आहे. या शोमध्ये सनी आणि बॉबीने अनेक खुलासे केले आहेत.
शोमधील लोकप्रिय रॅपिड फायर राऊंडमध्ये करण जोहरने सनीला त्याच्या मित्रांविषयीच्या आवडत्या आणि नावडत्या गोष्टी विचारल्या. सर्वात आधी शाहरुख खानबद्दल विचारलं असता सनी देओल म्हणाला, "शाहरुख खूप मेहनती आहे. पण त्याची एक गोष्ट मला आवडत नाही ती म्हणजे त्याने अॅक्टर्सला 'कमॉडिटी' बनवलं आहे." सनीचं हे उत्तर ऐकून करणने 'ओह गॉड' अशी रिएक्शन दिली. सनी देओलचा इशारा बहुदा शाहरुख खानच्या ब्रँड डीलवर होता. स्टीलपासून ते घरगुती सामान आणि विमलसारख्या जाहिरातींमध्येही शाहरुख खान दिसतो. इतक्या सर्व ब्रँडचा चेहरा असणं ही गोष्ट सनीला पटली नाही.
अक्षय कुमारबद्दल विचारल्यावर सनी म्हणाला,"अक्षयची शिस्त मला आवडते. पण तो प्रत्येक वर्षी डझनभर सिनेमे करतो हे मला आवडत नाही. आता याच वर्षीचं बघायचं तर त्याचा सेल्फी, ओएमजी 2, मिशन रानीगंज रिलीज झाले. तर आणखी अर्धा डझन सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. 'वेलकम टू द जंगल','हेरा फेरी 3','सिंघम अगेन' हे चित्रपट येणार आहेत."
भाईजान सलमान खान मोठ्या मनाचा आहे असं सनी यावेळी म्हणाला. मात्र त्याला प्रत्येकालाच बॉडिबिल्डर बनवायचं असतं हे मला आवडत नाही असं त्याने सांगितलं. यावर बॉबी देओलही म्हणाला की जेव्हा सलमानने त्याला रेस 3 साठी फोन केला होता तेव्हा शर्ट उतारेगा? असा प्रश्न विचारला होता.
सनी देओल सध्या गदर 2 चं यश एन्जॉय करतोय. तर पुढील वर्षी 'गदर 3' चं शूट सुरु होणार आहे. याशिवाय नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्येही सनीची वर्णी लागली आहे.