अभिनेत्री सनी लिओनीच्या (Sunny Leone) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केरळमध्ये सध्या सुट्टी एन्जॉय करत असलेल्या सनी लिओनीवर २९ लाख रुपये लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी केरळच्या क्राइम ब्रांचने (Crime Branch) सनी लिओनीची चौकशी देखील केली आहे. सनीने क्राइम ब्रांचसमोर आपली बाजू सांगितली असून तिने निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
कुणी आणि का केला आरोप?पेरुमबवूरचे इव्हेंट कोऑर्डिनेटर आर.शियास यांनी सनी लिओनीवर २९ लाख रुपये लाटल्याचा आरोप केला आहे. सनीने २०१६ साली एकूण १२ इव्हेंटसाठी २९ लाख रुपये घेतले पण तिनं एकाही इव्हेंटला उपस्थिती लावली नाही, असा आरोप आर.शियास यांनी केलाय. शियास यांनी यासंबंधीचे सर्व पुरावे देखील क्राइम ब्रांचकडे सोपवले आहेत. सनी लिओनीसोबत झालेले सर्व आर्थिक व्यवहार आणि काराराचे कागदपत्र देखील क्राइम ब्रांचकडे सादर केले आहेत.
क्राइम ब्रांचकडून सनीची चौकशीक्राइम ब्रांचकडून या प्रकरणाचा तपास केला जात असून सनी लिओनीची चौकशी करण्यात आली आहे. पण चौकशीतून वेगळीच माहिती समोर आली आहे. सनीने आर.शियास यांच्याकडून पैसे घेतल्याचं मान्य केलं आहे. पण आपण फक्त पाचवेळा शियास यांच्याकडून पैसे घेतले. तर इव्हेंटना न जाणं यात आपली काहीच चूक नसून इव्हेंट मॅनेजमेंटकडूनच इव्हेंटच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या, असं सनीनं म्हटलं आहे. याशिवाय, सनीने आताही इव्हेंटला उपस्थित राहण्याची तयारी दाखवली असून मॅनेजमेंटकडून मला याबाबतची पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी सनीनं केली आहे. सनी लिओनीच्या या दाव्यावर आता तक्रारदार काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
केरळमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय सनीसनी लिओनी आपल्या कुटुंबासोबत केरळमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय. यासोबतच एका खासगी चॅनलसाठी केरळमध्ये तिचं शूटिंग देखील होणार आहे. यासाठी ती Poovar Island च्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये ती थांबली आहे.