पूजा सामंत - मुंबई
चंदेरी विश्वाचं आकर्षण नसलेली व्यक्तीच विरळा. रुपेरी पडद्यावरच्या नामवंत स्टार्सचं वेळोवेळी फोटोसेशन करून त्यांना स्टारडम मिळवून देण्यात मोलाचा वाटा असलेले प्रसिद्ध सिनेछायाचित्रकार जयेश सेठ यांचा ‘रोल, साऊन्ड, कॅमेरा, अॅक्शन’ हा चित्रपट तयार झाला असून नवोदित कलाकार असलेल्या या सिनेमाचे सध्या पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे. जयेश सेठ यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची प्राथमिक तयारीही केली असून त्यांचा हा आगामी सिनेमा ममता कुलकर्णी या नव्वदच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रीच्या जीवनावर आधारित असल्याचे वृत्त आहे. यात सनी लिओन ममताच्या भूमिकेत असणार आहे.
‘रोल, साऊन्ड, कॅमेरा, एक्शन’ चित्रपट 2क्15 च्या आरंभीच प्रदर्शित होतोय. ममता कुलकर्णी व तिचा पती विकी गोस्वामी यांना अलीकडेच ड्रग्ज तस्करी प्रकरणी केनिया पोलिसांनी अटक केली होती. पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या ममताचे फोटोसेशन सर्वप्रथम जयेश सेठ यांनीच केले होते.
जयेश सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलीवूडमधे 8क्च्या दशकात जयेश सेठ यांनी आपला स्टुडिओ आणि उगवत्या कलाकारांचे फोटोसेशन्स करून व्यवसायास आरंभ केला. बँकॉकमध्ये वेटर-कम-कुक असलेला आजचा आघाडीचा स्टार अक्षयकुमार लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये त्यांच्या स्टुडिओत दररोज फे:या मारत असे. जयेश सेठ यांची फी देणं त्याला तेव्हा अवघड होतं. शेवटी त्याने जयेश सेठ यांचा साहाय्यक बनणो स्वखुशीने मंजूर केले. साहाय्यकाचे फोटोसेशन त्याचा पगार मानून केले गेले आणि त्या फोटोसेशननंतर अक्षयकुमारला प्रमोद चक्र वर्ती यांनी संधी दिली. जयेश सेठ सांगतात, नव्वदच्या दशकात आपल्या स्टुडिओत वरचेवर फोटोसेशनसाठी येणारी ममता सुंदर होती. मध्यमवर्गातली ममता तितकीच महत्त्वाकांक्षी होती, हे तिच्या बोलण्यातून जाणवलं. वन बीएचकेमधून थेट 3 बीएचकेमध्ये गेलेल्या ममताने तिच्या चित्रपटांतल्या मानधनातून मुंंबईत 2-3 फ्लॅट्स घेतले. प्रसिद्धी-पैसा सारं मिळूनही ममता चायना गेट, घातक सिनेमांच्या वेळी भेटली, तेव्हा म्हणू लागली, तिला जीवनात स्थैर्य हवंय, लग्न करून विदेशात स्थायिक होण्याचा विचार तिने बोलून दाखवला होता. नंतरच्या भेटीत तिने मदर टेरेसा बनायचे आहे, अशीही भावना बोलून दाखवली. ऐश्वर्य, लोकप्रियता मिळूनही या मुलीला आता नेमकं काय हवंय, या विचाराने मी बुचकळ्यात पडलो होतो, जयेश सेठ सांगतात.
त्यानंतर ममताबद्दल अनेक बातम्या कानावर पडत होत्या, पण ती संपर्कात नव्हती. शेवटी अलीकडे तिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी अटक केल्याची बातमी आली.
माधुरी दीक्षित, अजय देवगण, अक्षय कुमार हे आजचे यशस्वी स्टार्स जयेश सेठ यांचे क्लाएंट्स. यशाला शॉर्टकट नसतो हे अक्षय, अजय, माधुरी यांनी जाणलं आणि मेहनत करून यशाची वाट पाहिली. त्यांना यथावकाश यश मिळाले.
याउलट मंदाकिनी, मोनिका बेदी, ममता कुलकर्णीसारख्या सुंदर नायिका यश, झटपट पैसा आणि अति सुखासीन आयुष्य या मृगजळाच्या मागे लागल्या. माझा पुढचा चित्रपट या दुर्दैवी नायिकांच्या जीवनावर बेतलेला आहे. सनी लिओनला ममताच्या भूमिकेसाठी घेण्याचा आपला विचार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.