Join us

कंडोम जाहिरात वादावर सनी लिओनीचं "बोल्ड" प्रत्युत्तर

By admin | Published: April 22, 2017 11:35 AM

बॉलिवूडची "बेबी डॉल" सनी लिओनी आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हाच "बोल्ड" अंदाज तिच्यासाठी समस्या ठरत आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - बॉलिवूडची "बेबी डॉल" सनी लिओनी आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे.  मात्र गेल्या काही दिवसांपासून हाच "बोल्ड" अंदाज तिच्यासाठी समस्या ठरत आहे. सनीचं वादात अकडण्यामागील कारण आहे तिची "मॅनफोर्स कंडोम"ची जाहिराती. ही जाहिरात अनैतिकता आणि अश्लिलतेचा प्रचार करणारी तसेच समस्त महिला वर्गासाठी अपमानजनक असल्याचे सांगत "रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया" आठवले गटाच्या महिला आघाडीने या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदीची मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.
 
मात्र, यावर माघार न घेता सनीनं त्यांना आपल्या अंदाजात प्रत्युत्तर देऊन त्यांना क्लिन बोल्ड केले आहे. मॅनफोर्स कंडोमच्या जाहिरातीत करण्यात आलेले चित्रण हे सर्व कुटुंबाने एकत्रितपणे बसून पाहण्याजोगे नाही, असे रिपाइंच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी शीला गांगुर्डे यांचे म्हणणं होते. 
 
त्यांच्या या आरोपांना सनीनं रोखठोक उत्तर दिले आहे. "लोकशाही आणि बोलण्याचे स्वातंत्र्य या भारतातील सर्वांत महान गोष्टी आहेत. जर लोकांना माझ्याविरोधात आवाज उठवायचा असल्याते ते तसे करू शकतात. मात्र लोकांसाठी काय योग-अयोग्य या निर्णय सरकारच घेऊ शकते". 
 
"जेव्हा मी एखाद्या ब्रँडसोबत काम करते तेव्हा त्याची नैतिक जबाबदारीही स्वीकारते. कोणतेही जोडपे बाळ जन्माला घालण्याचं तेव्हाच नियोजन करतं जेव्हा ते पूर्णतः त्याबाबतची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार असतात. मी स्वीकारत असलेल्या जाहिरातींबाबतही माझा अशाच प्रकारचा दृष्टीकोन असतो.  मी या जाहिराती केवळ पैसा कमावण्यासाठी करत नाही", मॅनफोर्स कंडोमच्या जाहिरातीला विरोध करणा-यांना असे सडेतोड प्रत्युत्तर देऊन सनीनं त्यांचं तोंड बंद केले आहे.   
 
 
नेमके काय आहे प्रकरण?
अभिनेत्री सनी लिओनी करत असलेल्या मॅनफोर्स कंडोमच्या जाहिराती या अनैतिकता आणि अश्लिलतेचा प्रचार करणाऱ्या तसेच समस्त महिला वर्गासाठी अपमानजनक असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीने या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदीची मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. एखाद्या कंडोमची जाहिरात करण्याला आमचा विरोध नाही. मात्र या विशिष्ट कंपनीच्या जाहिरातीत करण्यात आलेले चित्रण हे सर्व कुटुंबाने एकत्रितपणे बसून पाहण्याजोगे नसल्याचा आरोपही रिपाइंच्या महिला आघाडीने केला आहे.
 
मॅनफोर्स कंडोमच्या जाहिरातीसंदर्भात आम्हाला अनेक महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून ही जाहिरात सहकुटुंब पाहणे म्हणजे खुपच लज्जास्पद अनुभव असल्याचा दावा रिपाइंच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला. उच्च भारतीय संस्कृती आणि प्राचीन काळापासून आपल्या आचार विचारात असलेली तत्त्वे आणि नितीमूल्ये यांचा विचार करता ही जाहिरात म्हणजे आपल्या संस्कृतीवर एक प्रकारे घाला आणण्याचा प्रकार असल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 
 
या जाहिरातील स्त्री पात्राच्या चेहऱ्यावरील बिभत्स आणि अश्लील भाव हे नैतिकता आणि महिलांच्या सन्मानाची पायमल्ली करणारे आहेत. त्यामुळे आम्ही या तक्रारीद्वारे केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याला या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घालण्याची विनंती केली आहे. तसेच संबंधित विभागाने आमच्या तक्रारीची दखल न घेतल्यास आम्ही राज्य महिला आयोगाकडेही दाद मागणार असल्याची माहिती रिपाइंच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी शीला गांगुर्डे यांनी दिली.