हृतिक रोशनचासुपर 30 हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन हृतिक सध्या करत आहे. ‘सुपर 30’ हा सिनेमा गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आनंद कुमार बिहारमध्ये सुपर 30 नावाचा एक उपक्रम चालवतात. या उपक्रमातंर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरीब आणि होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.
सुपर 30 या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद यांनी नुकतीच एनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सांगितलेली एक गोष्ट ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांच्या आयुष्यावर चित्रपट करण्याविषयी त्यांनी या मुलाखतीत सांगितले की, या चित्रपटामुळे बिहारची प्रतिष्ठा वाढेल. भारतातील अनेक विद्यार्थी कठीण परिस्थितीवर मात करून कशाप्रकारे यश मिळवतात ही गोष्ट जगभरात पोहोचेल. माझ्या आयुष्यावर बायोपिक करण्याची या चित्रपटाचे लेखक आणि निर्मात्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी माझ्याकडून परवानगी मागितली होती. त्यांना काहीही करून हा चित्रपट लवकरात लवकर बनवायचा होता. मृत्यू कधी येईल हे आपण कधीच सांगू शकत नाही असे मला वाटते. त्यामुळे मी जिवंत असताना हा बायोपिक बनावा अशी माझी इच्छा होती.
या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद यांनी त्यांच्या आयुष्यातील एक खूपच खाजगी बाब सगळ्यांसोबत शेअर केली आहे. एनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आजवर माझ्या कुटुंबाला आणि माझ्या काही जवळच्या विद्यार्थ्यांना याविषयी माहिती होते. पण ही गोष्ट मी आज सगळ्यांना सांगत आहे. 2014 मध्ये मला एका कानाने ऐकू येत नव्हते. त्यामुळे मी पटनाला एका डॉक्टरकडे जाऊन याविषयी सांगितले. तर त्यांनी काही टेस्ट केल्या आणि माझ्या एका कानाची ऐकण्याची क्षमता 80-90 टक्के कमी झालेली असल्याचे सांगितले. त्यामुळे मी उपचारासाठी दिल्लीला जायचे ठरवले. तिथे एका मोठ्या रुग्णालयात मला खूप साऱ्या टेस्ट करायला सांगितल्या. त्या टेस्टचे रिपोर्ट आल्यावर मला सांगण्यात आले की, माझ्या कानाला आणि मेंदूला जी नस जोडते, त्यात ट्युमर आहे. हे ऐकून मला तिथेच चक्कर यायला लागली. माझ्यासोबत असलेल्या माझ्या विद्यार्थ्याने मला त्यावेळी सांभाळले. त्यानंतर त्या रुग्णालयाच्या हेड ऑफ डिपार्टमेंटची मी भेट घेतली. त्यांनी मला सांगितले की, मी ऑपरेशन केले नाही तरी मी दहा वर्षं जिवंत राहू शकतो. तरी मी सेकंड ओपिनियन घ्यायला मुंबईला गेलो. तेथील डॉक्टरने मला सांगितले की, ऑपरेशन केले तर ब्रेन ट्युमर पूर्णपणे जाऊ शकतो. पण ऑपरेशनमध्ये थोडी जरी चूक झाली तर माझे तोंड कायमचे वाकडे होईल, पापणी मिटणार नाही आणि एका कानाने मला कधीच ऐकता येणार नाही. हे सगळे ऐकल्यावर मी ऑपरेशन करण्याचा विचार सोडला. सध्या माझ्यावर काही उपचार सुरू असून दर सहा महिन्याने मला सगळ्या टेस्ट कराव्या लागतात.
‘सुपर 30’ हा चित्रपट नोव्हेंबर 2018 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलचे नाव मीटू मोहिमेत आले. त्यामुळे त्याला या चित्रपटातून हटवण्यात आले. साहजिकच ‘सुपर 30’ लांबला. पुढे या चित्रपटासाठी 26 जानेवारी 2019 चा मुहूर्त ठरला. पण यावेळी कंगनाचा ‘मणिकर्णिका’ आडवा आला. त्यामुळे हृतिकने ‘सुपर 30’ची रिलीज डेट पुढे ढकलली होती.