Join us

रस्त्यावर पापड विकणाऱ्या ह्रतिक रोशनला लोकांनी ओळखलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 11:29 AM

या भूमिकेसाठी केलेला मेकओव्हर इतका जमून आला होता की, रस्त्यावरील लोकांनी त्याला ओळखलेच नाही.

मुंबई: बॉलिवूड स्टार ह्रतिक रोशन याचा सुपर 30 हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे. 'कोई मिल गया'मध्ये ऑटिस्टिकच्या व्याधीने ग्रस्त असलेला मुलगा ते अलीकडच्या 'काबिल' चित्रपटात साकारलेली अंध व्यक्ती असो, या प्रत्येक भूमिकेसाठी ह्रतिकने जीवापाड मेहनत केली होती. त्यामुळे बॉलिवूडमध्ये ह्रतिकची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता अशी ओळख निर्माण झाली आहे. आगामी सुपर 30 या चित्रपटातही ह्रतिकने त्याची ही ओळख पूरेपूर जपली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता सुपर 30 च्या चित्रीकरणादरम्यानचे किस्से कानावर पडायला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात ह्रतिक रोशन रस्त्यावर पापड विकतानाचे एक दृश्य आहे. हा सीन जयपूरच्या रस्त्यांवर भर गर्दीत चित्रीत करण्यात आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्रतिकने या भूमिकेसाठी केलेला मेकओव्हर इतका जमून आला होता की, रस्त्यावरील लोकांनी त्याला ओळखलेच नाही. या दृश्यासाठी ह्रतिकने दाढी वाढवलेली होती. खांद्यावर उपरणे आणि अघळपघळ कपडे पेहरावात त्याने हे दृश्य चित्रीत केले. त्यामुळेच बहुधा ह्रतिकला कोणी ओळखले नसावे. सध्या सोशल मीडियावर ह्रतिकच्या या लूकचे फोटो व्हायरल होत आहेत.

टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूड