सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 3 हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अत्यंत आवडता लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो बनला आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक खूप चांगले नर्तक असल्याने या कार्यक्रमाचे विजेतेपद कोण मिळवणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. गौरव सर्वण, सक्षम शर्मा, जयश्री गोगोई, तेजस वर्मा या सगळ्यांना मागे टाकत कोलकत्याची सहा वर्षांची रुपसा बताब्याल या कार्यक्रमाची विजेती ठरली.
रुपसाचा डान्स परफॉर्मन्स, तिच्या अदा प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या होत्या. दर आठवड्यातील तिचा परफॉर्मन्स पाहून तीच सुपर डान्सरची विजेती बनेल असे म्हटले जात होते. सुपर डान्सरचे विजेतेपद मिळाल्यानंतर रुपसा प्रचंड खूश झाली होती. तिने सांगितले, सुपर डान्सरचे विजेतेपद मिळाल्याबद्दल मी प्रचंड खूश झाले आहे. मला डान्स ही गोष्ट प्रचंड आवडत असल्याने यापुढे देखील मी डान्सकडे लक्ष देणार आहे. मी आता लवकरच कोलकत्याला माझ्या घरी जाऊन माझ्या कुटुंबियांसोबत माझ्या या यशाचे सेलिब्रेशन करणार आहे.
सुपर डान्सरची विजेती ठरलेल्या रुपसाला १५ लाख रुपयांचा चेक तर तिचा गुरू निशांत भट्टला पाच लाखांचा चेक सोनी वाहिनीकडून प्रदान करण्यात आला तर तेजस वर्मा हा स्पर्धक या कार्यक्रमाचा उपविजेता ठरला.
सुपर डान्सरच्या फिनालेला सगळ्याच स्पर्धकांनी एकाहून एक परफॉर्मन्स सादर केले. या कार्यक्रमाचे परीक्षक अनुराग बासू, गीता कपूर आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांनी त्यांच्या सुपर डान्सरच्या आजवरच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शिल्पाने छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच भरतनाट्यम सादर करत सगळ्यांची वाहवा मिळवली.
द कपिल शर्मा शो फेम कृष्णा अभिषेकने सुपर डान्सच्या फिनालेला त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले. तसेच धर्मेश सर आणि राघव जुयाल यांनी देखील स्पर्धकांचे मनोबल उंचावण्यास मदत केली.
शिल्पा शेट्टीने रूपसाच्या विजेतेपदाबद्दल मत व्यक्त करताना सांगितले की, सुपर डान्सरच्या विजेतेपदासाठी रुपसा ही अतिशय योग्य आहे. ती प्रत्येक आठवड्याला खूप चांगला परफॉर्मन्स सादर करत होती. मी या कार्यक्रमाची परीक्षक होती आणि हा प्रवास मी जवळून पाहिला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते.