बॉलिवूडमध्ये 80 च्या दशकात एक-दोन नाही तर अनेक मोठ्या स्टार्सचा बोलबाला होता. याच काळात मुंबईच्या चाळीतला एक छोकरा बॉलिवूडमध्ये आला आणि बघता बघता यशाच्या शिखरावर पोहोचला. स्वत:च्या करिअरलाच नाही तर भारतीय सिनेमालाही त्याने एक नव्या उंचीवर नेलं. मुंबईच्या चाळीतला हा छोकरा कोण तर जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ) .
होय, जॅकी श्रॉफची लाईफ स्टोरी कुठल्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. चाळीतल्या या पोरांनं इंडस्ट्रीत असे काही पाय रोवले की, सगळेच थक्क झालेत. ‘हिरो’ सुपरडुपर हिट झाल्यानंतरही जॅकी चाळीतच राहत होता. सुपरस्टार बनल्यानंतरही अनेक वर्षे तो चाळीत राहिला. त्याला साईन करण्यासाठी बड्या बड्या निमार्ता दिग्दर्शकांनाही चाळीत यावं लागाायचं. विश्वास बसणार नाही, पण जॅकीने त्याच्या अनेक चित्रपटाचं शूटींग चाळीत केलं. निर्माता-दिग्दर्शक चाळीत शूट करायला तयार नसायचे. पण जॅकीची डिमांड त्यांना असं करायला भाग पाडायची. आजही जॅकीचे पाय जमिनीवर आहेत, ते याचमुळे. असं नसतं तर नोकराच्या सांत्वनासाठी त्यानं थेट पुण्याजवळचं खेडं गाठलं नसतं.
होय, जग्गू दादाचं मावळ चांदखेड येथे फार्म हाऊस आहे. तिथं काम करणा-या एका नोकराच्या वडिलांचं नुकतच निधन झालं. जॅकीला ही गोष्ट समजली आणि तो थेट आपल्या या नोकराच्या घरी सांत्वनासाठी पोहोचला. त्याने थेट मावळ चांदखेड गाठत गायकवाड कुटुंबाची भेट घेतली आणि या कुटुंबाच सांत्वन केलं. जमिनीवर बसून कुटुंबासोबत त्याने गप्पा मारल्या आणि आस्थेने विचारपूस केली.
सागर दिलीप गायकवाड असं जॅकीकडे काम करणा-या या नोकराचं नाव आहे. तो जॅकीच्या चांदखेड येथील फार्म हाऊवर काम करतो. त्याचे वडील दिलीप गायकवाड यांचं नुकतच अल्पशा आजाराने निधन झालं. याची माहिती कळताच जॉकी श्रॉफ गायकवाड कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी चांदखेड येथील त्यांच्या घरी पोहोचला. इतकंच नाही तर सागर गायकवाडची आज्जी तान्हाबाई गायकवाड यांच्या शेजारी जमिनीवर बसून त्याने गरीब कुटुंबाला धीर दिला. घरातील लहान थोरांची सर्वांची विचारपूस केली.