रजनीकांत यांना हैद्राबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब वाढला असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना सकाळपासून ठेवण्यात आले आहे. आज सकाळी त्यांचा रक्तदाब वाढल्यानंतर त्यांना हैद्राबाद येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, रक्तदाब सोडला तर त्यांना तब्येतीची कोणतीच तक्रार नाहीये. रजनीकांत यांना २५ डिसेंबरला सकाळी दाखल करण्यात आले असून ते गेल्या १० दिवसांपासून हैद्राबादमध्ये चित्रीकरण करत आहेत. रजनीकांत यांच्या सेटवर काही लोकांना कोरोनाची लागण झाली होती. पण रजनीकांत यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तरीही त्यांनी स्वतःला काही दिवसांपासून सगळ्यांपासून वेगळे ठेवले आहे.
अपोलो रुग्णालयाने स्टेटमेंटमध्ये पुढे म्हटले आहे की, रजनीकांत यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीयेत. केवळ रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब नियंत्रणात आल्यावर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल.
रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण हैद्राबाद मध्ये सुरू होते. या चित्रपटाच्या सेटवरील सात जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण काही काळासाठी थांबवण्यात आले होते. त्यानंतर लगेचच रजनीकांत यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.