साऊथमध्ये देवासारखे पुजले जाणारे मेगास्टार रजनीकांत (Rajinikanth) वैद्यकीय चाचण्यांसाठी विशेष विमानाने अमेरिकेला जाऊ इच्छित होते. कोरोना महामारीमुळे त्यांनी यासाठी केंद्र सरकारची परवानगी मागितली होती. ताज्या माहितीनुसार, केंद्राने यासाठी परवानगी दिली असून लवकरच रजनीकांत विशेष विमानाने अमेरिकेला रवाना होणार आहे. (Rajinikanth Health)रजनीकांत यांच्या या विशेष विमानात 14 लोकांची आसन क्षमता आहे. रजनीकांत यांच्यासोबत काही कुटुंबातील सदस्यही जाणार आहेत. त्यांचा जावई व अभिनेता धनुष आधीच पत्नी व मुलांसोबत अमेरिकेत आहे. धनुष याठिकाणी आपल्या हॉलिवूड सिनेमाचे शूटींग करतोय. अशात रजनीकांत यांच्या अमेरिकेतील मेडिकल चेकअपदरम्यान तो सुद्धा सोबत असणार आहे.
काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोज घेतला होता. मुलगी सौंदर्याने त्यांचा लस घेतानाचा फोटोही शेअर केला होता.गेल्यावर्षी 25 डिसेंबरला रक्तदाब वाढल्यामुळे रजनीकांत यांना हैदराबादेतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. नव्या वर्षात रजनीकांत त्यांच्या राजकीय पक्षाची घोषणा करणार होते. मात्र प्रकृती कारणास्तव त्यांनी सक्रीय राजकारणात उतरण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहिर केले होते.
लोकांनी मात्र रजनीकांत यांनी राजकारणात येण्याचा निर्णय रद्द करू नये, अशी गळ घातल चक्क रस्त्यावर निदर्शने सुरू केली होती. यानंतर माझी प्रकृती ठीक नाही. कृपया मला वेदना देऊ नका, असे म्हणत राजकारणात न येण्याचा माझा निर्णय ठाम असल्याचे सांगितले होते. साऊथ फिल्म इंडस्ट्रीत देवासारखे पुजले रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरुतील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचा प्रवास अद्भूत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्याइतकी लोकप्रियता कुणालाच मिळवता आली नाही.