Join us  

चलो अयोध्या... सुपरस्टार रजनीकांतला राम मंदिर ट्रस्टकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 5:28 PM

सुपरस्टार रजनीकांत यांनी 'जेलर' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अयोध्या दौरा केला होता.

देशभरात २२ जानेवारीच्या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह आणि लगबल सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ जानेवारी रोजी देशात दिवाळी साजरी करा, असे आवाहन देशवासीयांना केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राम मंदिर सोहळ्यासाठी देशभरातील नामवंत आणि दिग्गजांना मंदिर ट्रस्टकडून निमंत्रण दिलं जात आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांना आणि सेलिब्रिटींनाही खास निमंत्रण दिलं जात आहे. राम मंदिर ट्रस्टकडून साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे. 

सुपरस्टार रजनीकांत यांनी 'जेलर' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अयोध्या दौरा केला होता. १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला जेलरने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. यादरम्यान, रजनीकांत उत्तर भारत दौऱ्यावर गेले, त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत जेलर चित्रपट पाहिला. रजनीकांत यांनी योगींच्या पाया पडून आशीर्वादही घेतला. सीएम योगींनी भेटीचा फोटो शेअर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रजनीकांत यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचीही भेट घेतली होती. अयोध्येतील याच दौऱ्यात प्रभू श्रीराम यांच्या मंदिरात जाऊनही त्यांनी दर्शन घेतले होते.

आता, रजनीकांत यांना २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजपा नेते रा. अर्जुनमूर्ती यांनी ट्विटर अकाऊंटवरुन या निमंत्रणाचे फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे, राम मंदिर सोहळ्यासाठी रजनीकांत अयोध्येला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याचे उत्तर २२ जानेवारी रोजीच देशाला मिळणार आहे. दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन सध्यातरी चांगलाच वाद होताना दिसत आहे. भाजपाने सिलेक्टेड लोकांनाच राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण दिल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना या सोहळ्याचं निमंत्रण न दिल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केल होता.  

टॅग्स :अयोध्याराम मंदिररजनीकांत