ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन हा दक्षिणेचे सुपरस्टार अभिनेता रजीनकांत यांचे अपहरण करणार होता, असा दावा प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी केला आहे. वर्मा यांनी वीरप्पनच्या आयुष्यावर आधारित चित्रपट दिग्दर्शित केला असून लवकरच तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी संशोधन करतानाच आपल्याला ही माहिती मिळाल्याचे वर्मा यांनी नमूद केले.
या चित्रपटासाठी वर्मा यांनी वीरप्पनचे एकेकाळचे साथीदार तसेच सरकार व वीरप्पन यांच्यादरम्यान मध्यस्थ म्हमून काम करणा-या व्यक्ती यांच्यासह वीरप्पनला संपवण्याच्या मोहिमेत सहभागी असलेल्या काही पोलिस अधिका-यांशी बातचीत केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे वर्मा यांच्यासमोर या चंदनतस्कराच्या जीवनाचे विविध पैलू समोर आले असून त्याचा या चित्रपटात समावेश करण्यात आला आहे. कन्नड मेगास्टार राजकुमार यांच्याप्रमाणेच दक्षिणचे सुपरस्टार रजनीकांत यांचेही अपहरण करण्याचा वीरप्पनचा विचार होता आणि तसा एक सीनही चित्रपटात समाविष्ट करण्याच आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चंदनतस्कर असलेल्या वीरप्पनचे आयुष्य अनेक नाट्यपूर्ण घटनांनी भरलेलं तर होतंच पण त्याला कंठस्नान घालण्याचे मिशनही तेवढंच नाट्यपूर्ण होतं, अस मत राम गोपाल वर्माने नमूद केले. येत्या २७ मे रोजी 'वीरप्पन' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.