दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता राम चरण केवळ साऊथ पुरताच मर्यादीत नाही. तर बॉलिवूडकरही त्याचे चाहते आहेत. तो कुठेही गेला तरी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत असतो. सध्या राम मुंबईमध्ये असून त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची भेट घेतली आहे. यावेळी पत्नी उपासनाही त्याच्यासोबत होती.
मुख्यमंत्री शिंदेंच्या सोशल मीडिया अकाऊंटने हे फोटो शेअर केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी राम आणि उपासना यांचे पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन स्वागत केले. तसेच चित्रपट क्षेत्रासह विविध विषयांवर सकारात्मक संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली श्रीकांत शिंदे याही उपस्थित होत्या.
नुकतेच राम चरण हा पत्नी आणि मुलीसोबत मुंबईमधील महालक्ष्मी मंदिरात पोहोचला होता. महालक्ष्मी मंदिरातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये राम चरण आणि त्याची पत्नी उपासना हे दोघे देवीचे दर्शन घेताना दिसत आहे. उपासना ही कालिनला जवळ घेऊन उभी देवीची प्रार्थना करताना दिसत आहे.
राम चरणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात त्याने कॅमिओ केला होता. आता राम चरण लवकरच 'गेम चेंजर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची राम चरणचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात तो कियारा आडवाणीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. शिवाय रवीना टंडनची लेक राशा थडानीही राम चरणसोबत तेलुगू सिनेमातून डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे.