- प्रियांका लोंढेअशी ही बनवाबनवी... धूमधडाका... धडाकेबाज... झपाटलेला... आयत्या घरात घरोबा या ऐंशी-नव्वदच्या दशकातील सिनेमांमध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे या स्टार कलाकारांनी एकत्र येऊन मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खऱ्या अर्थाने मल्टिस्टार सिनेमांचा पायंडा घातला. या कलाकारांना एका सिनेमामध्ये एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असायचे आणि फक्त यांच्या नावावरच सिनेमे सुपरहिट होऊन जायचे. आजही मल्टिस्टार सिनेमांची क्रेझ युथमध्ये पाहायला मिळत असून, एका सिनेमात अनेक स्टार्स दिसत असल्याने अशा सिनेमांना आपसूकच जास्त हिट्स मिळतात. दुनियादारी, क्लासमेट्स, हायवे, नटरंग, झेंडा, फक्त लढ म्हणा, तू ही रे, प्यारवाली लव स्टोरी, पोश्टर गर्ल, कट्यार काळजात घुसली, अशा अनेक मल्टिस्टार सिनेमांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले अन् त्यांचे बॉक्स आॅफिस कलेक्शन सुपरहिट ठरले. नटसम्राट - कुणी घर देता का घर, या एका डायलॉगसाठी नटसम्राट नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी महेश मांजरेकर यांनी नटसम्राटला मोठ्या पडद्यावर आणले. नाना पाटेकर यांनीदेखील गणपतराव बेलवलकर म्हणजेच अप्पांची भूमिका जीव ओतून पडद्यावर जिवंत केली. नटसम्राटला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले अन् चित्रपट सुपरहिट झाला. नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, विक्रम गोखले, सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, नेहा पेंडसे, अजित परब या कलाकारांनी नटसम्राटमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या. १ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित झालेल्या नटसम्राटने वर्षाच्या सुरुवातीलाच दणक्यात बार उडवून दिला अन् आतापर्यंतची सर्वात जास्त ४० करोड एवढी कमाई करून मराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्ड केले आहे. कट्यार काळजात घुसली - कट्यार काळजात घुसली या नाटकानंतर सुबोध भावे यांनी कट्यारसारख्या अभिजात कलाकृतीला मोठ्या पडद्यावर साकारण्याचे आव्हान घेतले अन् ही भव्यदिव्य कलाकृती मराठी चित्रपटाच्या इतिहासात अजरामर होऊन गेली. कट्यारला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. शंकर महादेवन, सचिन पिळगावकर यांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांच्या मनावर चढली अन् या क्लासिकल गाण्यांना तरुणांनीदेखील तितकेच पसंत केले. सुबोध भावे, सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे या कलाकारांनी दर्जेदार अभिनय साकारून कट्यारला अनेक पुरस्कारही मिळवून दिले. थिएटर्सच्या बाहेर हाऊसफुल्लच्या पाट्या झळकावलेल्या या चित्रपटाचे बॉक्स आॅफिस कलेक्शन ३० करोड रुपये आहे. क्लासमेट्स - आजच्या युथला अधिक भावणारा अन् त्यांच्या जवळ जाणारा विषय म्हणजे फ्रेंडशिप. ‘दुनियादारी’नंतर कॉलेजमधील मित्रांच्या लाइफवर प्रकाश टाकणारा क्लासमेट्स हा सिनेमा १६ जानेवारी २०१५ रोजी प्रदर्शित झाला़ अन् कॉलेजियन्सनी या चित्रपटाला थम्प्सअप देऊन सुपरहिट केला. सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, सिद्धार्थ चांदेकर, सचित पाटील, सुयश टिळक या कलाकारांनी कॉलेज तरुणांच्या भूमिका साकारून युथला अॅट्रॅक्ट केले़ आदित्य सरपोतदार दिग्दर्शित अन् क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून साकारलेला हा सिनेमा प्रेक्षकांना थेट अपील झाला. क्सासमेटचे टोटल बजेट ५ करोड असून, या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर २१ करोडचा गल्ला जमविला आहे.दुनियादारी - मित्रांमधील दोस्ती दाखविणारा अन् कट्ट्यांवरच्या मुलांपासून सगळ्यांना आपलेसे करणारा सिनेमा म्हणजे दुनियादारी. कॉलेजमधील मित्रांची कथा रंगविणारा हा चित्रपट प्रत्येक मुलाला आपलासा वाटतो. सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, ऊर्मिला कोठारे, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने अन् डायलॉगबाजीने दुनियादारीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. सुहास शिरवाळकरांच्या कादंबरीवरून काढलेला हा सिनेमा थेट प्रेक्षकांना अपील होतो. संजय जाधव दिग्दर्शित हा सिनेमा १९ जुलै २०१३ रोजी प्रदर्शित झाला अन् पाहता पाहता या सिनेमाने सारे रेकॉर्ड्स ब्रेक केले. ५ करोडच्या बजेटमध्ये तयार झालेल्या दुनियादारीने बॉक्स आॅफिसवर ३० करोड कमाई केली आहे.
मल्टिस्टार चित्रपटांचे सुपरहिट कलेक्शन
By admin | Published: March 20, 2016 2:13 AM