Join us

देशाने बहुमताने निवड केलेल्या मोदींना पाठिंबा द्या - शाहरुख खान

By admin | Published: April 16, 2016 8:56 PM

जर देशाने बहुमताने पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड केली आहे तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा असं वक्तव्य बॉलिवूड बादशहा शाहरुख खानने केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १६ - जर देशाने बहुमताने पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड केली आहे तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा असं वक्तव्य बॉलिवूड बादशहा शाहरुख खानने केलं आहे. आपला कोणत्याही पक्षाशी काही वाद नसल्याचंही शाहरुख खानने स्पष्ट केलं आहे. असहिष्णुतेवर शाहरुख खानने केलेल्या वक्तव्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी त्याच्यावर जोरदार टीका केली होती.
 
धार्मिक असहिष्णुता ही सर्वात वाईट असून त्यामुळे भारताची वाटचाल अंधाराकडे होत असल्याचं वक्तव्य शाहरुख खानने केलं होतं. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शाहरुख खानच्या वक्तव्यावर आक्षेप घेतं टीका केली होती. भाजपच्याही नेत्यांनी शाहरुख खानवर टीका करत काँग्रेसची मदत करण्यासाठी वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. 
 
'जेव्हा आपण आपल्या देशाचा नेता निवडतो, मग तो कोणीही असो आपण सर्वांनी मिळून त्याला पाठिंबा दिला पाहिजे. आपल्या देशाने बहुमताने त्यांची निवड केली आहे. त्यामुळे आपण आपल्या नेत्याला पाठिंबा देत देशाला पुढे जाण्यास मदत केली पाहिजे. नकारात्मकता पसरवली जाऊ नये', असं मत शाहरुख खानने व्यक्त केलं आहे. इंडिया टीव्हीवरील 'आप की अदालत' कार्यक्रमात बोलताना शाहरुख खानने हे मत मांडलं आहे.
 
'राजकारणात अनेक राजकारण्यांनी असहिष्णुतेवर वक्तव्य केलं असेल. पण आम्ही राजकारणी नाही आहोत, मनोरंजन करणारे आहोत. एकाअर्थी आम्ही अशी लोक आहोत ज्यांच्याकडे पाहून लहान मुलं त्यांच्यासारखे यशस्वी बनण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे देशविरोधी वक्तव्य आम्ही करणार नाही', असंही शाहरुख खानने म्हटलं आहे.
 
'मी फक्त देशातील तरुणांना धर्म, जात यासारख्या गोष्टींशी संबंधित घटनांमध्ये असहिष्णु होऊ नका असा सल्ला दिला आहे. माझे वडील सर्वात तरुण स्वातंत्र्यसैनिक होते. या देशाने माझ्यावर अन्याय केला असा विचार मी कसा करु शकतो ? मला या महान देशाकडून सगळं काही मिळालं आहे. तक्रार करणार मी शेवटचा व्यक्ती असेन', असंही शाहरुख खान बोलला आहे. 'माझं कुटुंब छोटा भारत आहे. माझी पत्नी हिंदू आहे, मी जन्माने मुस्लिम आहे आणि माझी तीन मुलं तीन धर्मांचं पालन करतात', असं शाहरुख खानने सांगितलं आहे.