मुंबई - कलर्स मराठी वाहिनीवरील 'सूर नवा ध्यास नवा- आशा उद्याची' या रिएलिटी शोचा अंतिम सोहळा २५ सप्टेंबर रोजी पार पडला. यंदाच्या ५ व्या आणि लक्षवेधी शोमध्ये अंतिम विजेता कोण ठरणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. यंदाच्या वर्षी कार्यक्रमात राजगायक होण्याचा मान उत्कर्ष वानखेडे याने पटकावला. त्याला भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय संगीतकार कल्याणजी – आनंदजी या जोडीतील आनंदजींच्या हस्ते सुवर्ण कट्यार देण्यात आली. दरम्यान, गतवर्षी अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदे ही विजेती ठरली होती.
महाराष्ट्राच्याच नाही तर भारतभरातून सूर नवा ध्यास नवा स्पर्धेत उतरलेल्या पाच हजार स्पर्धकांनी सुरांचं नशीब आजमावलं. त्यापैकी १६ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. याच स्पर्धकांमधून अंतिम सहा शिलेदार मंचाला मिळाले. यात आरोही प्रभुदेसाई, उत्कर्ष वानखेडे, शुभम सातपुते, संज्योती जगदाळे, नवाब शेख आणि कल्याणी गायकवाड या सहा स्पर्धकांच्या नावाचा समावेश होता. अखेर, उत्कर्ष वानखेडे याने स्पर्धा जिंकून राजगायक होण्याचा किताब पटकावला. भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय संगीतकार कल्याणजी – आनंदजी या जोडीतील आनंदजी यांच्या हस्ते ‘सूर नवा ध्यास नवा’च्या या विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले.
दरम्यान, या स्पर्धकांमध्ये ‘सूर नवा ध्यास नवा’चा महाअंतिम सोहळा रंगला. या महाअंतिम सोहळ्यामध्ये स्पर्धकांमध्ये विजेतेपद जिंकण्यासाठी गाण्याची मैफल आणि संगीत युध्द पाहायला मिळाले. त्यातूनच महाराष्ट्राला नवीन सूर मिळाला.
विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव
उत्कर्ष वानखेडेला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्याकडून सुवर्ण कट्यार मिळाली. तसेच केसरी टूर्सतर्फे काश्मीर टूर आणि तोडकर संजीवनी कडून इलेक्ट्रिक स्कूटर भेट म्हणून देण्यात आली. तर संज्योती जगदाळे ही या कार्यक्रमाची पहिली उपविजेती ठरली. तिला कलर्स मराठीकडून एक लाखाचा धनादेश, केसरीकडून केरला टूर, महाभृंगराज ऑइलकडून पंचवीस हजाराचा धनादेश मिळाला. तसेच आरोही प्रभुदेसाई ही दुसरी उपविजेती ठरली. तिला कलर्स मराठीकडून ७५ हजारांचा धनादेश, केसरीकडून हिमाचल टूर, महाभृंगराज ऑइलकडून पंचवीस हजाराचा धनादेश मिळाला.
यंदा ५ व्यावर्षी अनोखा उप्रकम
रिॲलिटी शोच्या इतिहासात एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम घेऊन कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा (Sur Nava Dhyas Nava) या लाडक्या कार्यक्रमाचं यंदाचं पाचवं पर्व रसिकांच्या भेटीला आलं होतं. सुरेल स्पर्धक, कुशल वाद्यमेळ, अभ्यासू सूत्रधार आणि नवोदित गायकांना पैलू पाडणारे पारखी परीक्षक यांनी सजवलेली सुरेल मैफल ही जरी “सूर नवा”ची आजवरची ओळख असली तरी यंदा आणखी एक नवी ओळख नि नवा ध्यास घेऊन सूर नवाचा हा मंच प्रत्येक आठवड्यात रसिकांना एक नवा अनोखा नजराणा घेऊन आला होता. या पर्वात प्रत्येक आठवड्याच्या सर्वोत्तम गायकाला त्याचं स्वतःचं नवंकोरं गाणं देण्याचा विडा कलर्स मराठी आणि एकविरा प्रॅाडक्शन्सने उचलला. संगीतमय रिॲलिटी शोच्या इतिहासातला भारतात तरी हा पहिलाच अनोखा आणि एकमेवाद्वितीय असा उपक्रम ठरला.