बोलक्या डोळ्यांची आणि निरागस सौंदर्य लाभलेली अभिनेत्री व गायिका सुरैया (Suraiya) हिचा आज वाढदिवस. आज सुरैया या जगात नाही, पण तिचे नाव घेताच तिचा बोलका चेहरा डोळ्यांपुढे येतो तो आजही. (Suraiya Birth Anniversary)सुरैयाचे पूर्ण नाव सुरैया जमाल शेख. 15 जून 1929 रोजी लाहोरमध्ये तिचा जन्म झाला. सुरैयाचा मामा तिच्या कुटुंबाला मुंबईत घेऊन आला आणि पुढे सातच्या वर्षी बेबी सुरैया सिनेमात आली. पुढे सहनायिकेच्या भूमिका केल्यात आणि नंतर ‘इशारा’ हा संपूर्ण नायिका म्हणून तिला पहिला सिनेमा मिळाला. याच काळात गायिका म्हणूनही ती नावारूपास आली. 1948 ते 1951 या काळात तर सुरैया टॉपची नायिका बनली. अगदी मधुबालाही तिची चाहती होती. सुरैयाचा सिनेमा प्रदर्शित होणार म्हटलं की, प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर रांगा लावत.
याच सुरैयाच्या आयुष्यात याच काळात एक तरूण आला आणि त्याने जणू तिला वेड लावलं. हा तरूण कोण तर देव आनंद (Dev Anand ). होय, सुरैया हे देव आनंद यांचे पहिले प्रेम. त्याकाळी या जोडीची अनोखी लव्हस्टोरी प्रचंड चर्चेत होती. ( Love Story Of Dev Anand And Suraiya)देव आनंद यांनी सिनेमात जेमतेम करिअर सुरू केलं होतं तर सुरैया स्टार होती. पण याच स्टारवर देव आनंद भाळले होते.
1940 साली देव आनंद व सुरैया यांच्या प्रेमकथेला सुरूवात झाली होती. ‘विद्या’या सिनेमाच्या निमित्ताने देव आनंद व सुरैया यांनी एकत्र काम केले आणि पुढे 6 सिनेमात ही जोडी एकत्र दिसली आणि याचदरम्यान लव्हस्टोरी बहरली. भेटीगाठी सुरू झाल्या आणि या प्रेमाला नवे धुमारे फुटले. दोघांनीही सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभागा घेतल्या, दिल्लगी या सिनेमाच्या प्रीमिअर शोला दोघेही अगदी हातात हात घालून पोहोचले. साहजिकच लव्हस्टोरीची चर्चा सुरू झाली आणि इथेच या प्रेमकहाणीला दृष्ट लागली.देव आनंद हिंदू असल्याने सुरैयाच्या आजीने या नात्याला कडाडून विरोध केला. दोघांच्या सिनेमाच्या सेटवर जाऊन शूटींगमध्ये व्यत्यत आणण्यापर्यंत आजीने या प्रेमकहाणीला विरोध केला. एकदा तर एक साधा सीन होता. देवआनंद यांना सुरैयाच्या भुवयांचे चुंबन घ्यायचे होते. पण आजीने इतका विरोध केला की अखेर हा सीनच रद्द करावा लागला.
पुढे आजीचा हा विरोध इतका प्रखर झाला की,तिने देव व सुरैया यांच्या भेटीगाठी बंद केल्या. फोनवर बोलणेही कठीण झाले. या स्थितीतही देव आनंद यांनी सुरैयाला धीर दिला. पण एका क्षणाला आजीच्या विरोधापुढे सुरैया जणू पराभूत झाली. यानंतर एकदिवस ती देव आनंदला भेटली आणि मला विसर असे सांगून कायमची निघून गेली. ही भेट शेवटची ठरली. या भेटीनंतर देव आनंद भावाच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडले होते. तिकडे आजीला विरोध का केला नाही, हे शल्य आयुष्यभर सुरैयाला बोचत राहिलं. लग्नाचा विचारही तिने केला नाही. देव आनंद यांनी दिलेली अंगठी तिने समुद्रात फेकली. पण त्यांच्या आठवणी तिने हृदयात कायम जपून ठेवल्या. देव आनंद यांच्या आठवणीतच तिने उर्वरित आयुष्य काढलं आणि अखेर 2004 साली अखेरचा श्वास घेतला.