सध्या मराठी सिनेमा 'बाईपण भारी देवा' ने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. जबरदस्त स्टारकास्ट आणि कमाल स्टोरीमुळे हा सिनेमा प्रेक्षकांची गर्दी खेचून घेण्यात यशस्वी ठरलाय. अगदी ग्रुप ग्रुपने बायका चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सिनेमात अभिनेत्री सुरुची आडारकरनेही (Suruchi Adarkar) महत्वाची भूमिका साकारली आहे. वंदना गुप्तेच्या मुलीचा रोल तिने केलाय. सिनेमाला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता सुरुचीनेही खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आणि चित्रपटाच्या टीमचे आभार मानलेत.
सुरुचीने सोशल मीडियावर 'बाईपण भारी देवा' टीमसोबत फोटो शेअर केले आहेत. तसंच कॅप्शनमध्ये तिने लिहिले, "सर्वप्रथम 'बाईपण भारी देवा' या सुंदर कलाकृतीचा मला भाग होता आलं ह्यासाठी केदार शिंदे सर यांचे खूप आभार… सातत्याने चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न प्रत्येक कलाकार करत असतोचं पण तो करत असताना जेव्हा एखाद्या मोठ्या कलाकाराची साथ मिळते तेव्हा ती कला काही वेगळीचं बहरते, इथे तर मला १ नाही तब्बल ६ गुणी कलाकारांबरोबर काम करण्याचा मान मिळाला याचा आनंद कायमसाठी पुरेल. ह्या सिनेमाच्या संवादांनी काम करत असतानाचं आमच्या मनात घर केलं होतं जे आज तुमच्या मनात होताना आम्ही पाहतोय आणि तुम्हा प्रेक्षकांची मायेची थाप ही अनुभवतोय..
सुरुची पुढे म्हणाली, 'जी सिनेमासाठी आणि त्या सिनेमा मधल्या प्रत्येकासाठी फार महत्वाची असते म्हणूनचं तुम्ही या सिनेमावर जो प्रेमाचा वर्षाव केलात त्या बद्दल आम्ही कायमचं तुमचे ऋणी राहू. असेच आशीर्वाद मायबाप प्रेक्षक तुमचे कायम पाठीशी राहुद्या.'
सुरुचीला प्रेक्षकांनी बऱ्याच दिवसांनी पडद्यावर पाहिलंय. 'का रे दुरावा' मालिकेतून ती घराघरात पोहोचली. 'बाईपण भारी देवा' मध्ये तिला पाहून प्रेक्षकांना सरप्राईजच मिळालं. सध्या सिनेमाने २० कोटींचा टप्पा पार केला आहे. अजूनही सिनेमा थिएटरमध्ये अगदी दणक्यात सुरु आहे.