चेन्नई - समाजात होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा जय भीम चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटातील अभिनयासाठी दाक्षिणात्य अभिनेता सूर्या याचं खूप कौतुक झालं होतं. दरम्यान, आता याच चित्रपटातील एका दृश्यावरून सूर्या याच्यासमोरील कायदेशीर अडणचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमधील सैदापेट कोर्टाने चेन्नई पोलिसांना अभिनेता सूर्या, त्याची पत्नी ज्योतिका आणि जय भीम चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
रुद्र वन्नियार सेना नावाच्या एका वन्नियार समुहाने यासंदर्भात तक्रार दिली होती. आपल्या याचिकेमध्ये त्यांनी सांगितले की, जय भीम चित्रपटातील अनेक दृश्ये ही वन्नियार समुहाची प्रतिमा मलिन करत आहेत. संबंधित समुहाने जय भीम चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याबरोबरच या चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्ये हटवण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली होती. तसेच जय भीमच्या निर्मात्यांनी नुकसान भरपाई म्हणून पाच कोटी रुपये द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली होती.
जय भीम हा चित्रपट २ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. तसेच हा चित्रपट ऑस्करसाठीही पाठवण्यात आला होता. जय भीम चित्रपटामध्ये इरुलर समुदायातील व्यक्तींच्या तुरुंगात करण्यात आलेल्या छळाचे चित्रण करण्यात आले होते. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीपासूनच खूप वादामध्ये आहे.
सुरुवातीला हिंदी भाषिक लोकांनी या चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप घेतला होता. या चित्रपटातील एका दृश्यामध्ये प्रकाश राज हे हिंदी बोलला म्हणून एका व्यक्तीला मारतानाचं चित्र चित्रित करण्यात आलं होतं. त्यावरून खूप वाद झाला होता. आता वन्नियार समुहातील सदस्यांनी चित्रपटातून त्यांची प्रतिमा मलीन केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. वन्नियार संगमने त्यानंतर सूर्या, ज्योतिका आणि संचालक टीजे ज्ञानवेल आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडीओला कायदेशीर नोटीस पाठवली होती.