Join us

Suryavanshi : चित्रपटगृहे उघडण्याची घोषणा होताच अक्षयच्या 'सूर्यवंशी' प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 4:38 PM

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी ठाकरे सरकारनं दिली आहे. त्यामुळे, आता 70 मिमिच्या पडद्यावर आपल्या लाडक्या हिरो आणि हिरोईनला पाहता येईल.

ठळक मुद्देबॉलिवूडचं माहेर मुंबई आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाकडे संपूर्ण बॉलिवूड कलाकारांचे लक्ष लागले होते. म्हणूनच चित्रपटगृहे खुली करण्याची घोषणा होताच, सूर्यवंशीच्या प्रदर्शनाच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. 

मुंबई - राज्यात आता सर्वकाही अनलॉक होताना दिसत आहे. शाळा, प्रार्थनास्थळांपाठोपाठ चित्रपटगृह, नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, आता लवकरच बहुतप्रतिक्षित चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखाही जाहीर होणार असल्याचे दिसून येते. कारण, अक्षयकुमारसह तगडी स्टारकास्ट असलेल्या सूर्यवंशी चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.  

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी ठाकरे सरकारनं दिली आहे. त्यामुळे, आता 70 मिमिच्या पडद्यावर आपल्या लाडक्या हिरो आणि हिरोईनला पाहता येईल. चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करुन सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात लवकरच अधिकृत तारखेची घोषणा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, गेल्या 1.5 वर्षांपासून बंद असलेल्या सिनेमागृहात आता प्रेक्षकांची पालवी फुटणार आहे. बॉलिवूडचं माहेर मुंबई आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाकडे संपूर्ण बॉलिवूड कलाकारांचे लक्ष लागले होते. म्हणूनच चित्रपटगृहे खुली करण्याची घोषणा होताच, सूर्यवंशीच्या प्रदर्शनाच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. 

मुख्यमंत्र्यांचा निर्मात्यांशी संवाद 

चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे प्रतिनिधी यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. त्यानंतर चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. २२ ऑक्टोबरला राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू होतील. जवळपास दीड वर्षापासून चित्रपटगृह, नाट्यगृह बंद आहेत. ती सुरू करण्यासाठी महिन्याभराचा वेळ लागेल. 

‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ट्रेलर पाहताच चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह आणि अजय देवगण पाहुण्याकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. चित्रपटात अक्षय पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी हा चित्रपट ३० एप्रिलला प्रदर्शित होणार होता. त्यानंतर, 15 ऑगस्टच्या तारखेचीही चर्चा झाली. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. 

बॉलिवूडसाठी मुंबई महत्त्वाची

देशातील अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृह सुरू करण्यात आली आहेत. दिल्ली, लखनऊमध्ये सिनेमागृह सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. बॉलिवूडला सर्वाधिक उत्पन्न मुंबईतून मिळतं. त्यामुळे ही मागणी करण्यात येत होती. अखेर आज याबद्दलचा निर्णय झाला. 

टॅग्स :मुंबईबॉलिवूडअक्षय कुमाररोहित शेट्टी